महादरे फुलपाखरु राखीव संवर्धन केंद्राबाबत उत्सुकता
सातारा :
सातारा शहराला लागूनच असलेल्या व अलिकडेच शहराच्या हद्दीत आलेल्या महादरे गावाच्या पसिरातील फुलपाखरु संवर्धन केंद्रास तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मान्यता दिली होती. त्याबाबत तेथील स्थानिकांना नेमके हे फुलपाखरु राखीव संवर्धन केंद्र कसे असेल त्याबाबत उत्सुकता लागली असून त्याच अनुषंगाने महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इस्टिट्युट (मेरी) या संस्थेने त्यावर व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन तो शासनाकडे गेल्या तीन महिन्यापूर्वी सादर केला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पुढील हालचाली होतील, अशी माहिती मेरीचे अध्यक्ष सुनील भोईटे यांनी सांगितले. दरम्यान, सातारा नगरपालिकेनेही बजेटमध्ये याच फुलपाखरु संवर्धन केंद्राच्या अनुषंगाने तरतूद केली होती. मात्र, वनविभागाकडून तशी कोणतीही पालिकेकडे मागणी झालीच नसल्याचे समजते.
सातारा शहराला लागूनच डोंगराच्या कुशीत महादरे हे गाव वसले आहे. त्या गावाच्या भोवतीने दाट झाडी आहे. त्या झाडीत तसेच डोंगरात महादरेच्या शिवारात वेगवेगळी १७८ फुलपाखरांच्या प्रजाती असल्याचा शोध काही संशोधकांनी लावला होता. त्या परिसरात क्रिमसन रोज, मलाबर बँडेड पिकॉक, तमीळ स्पॉटेड प्लॅट, सर्दन बर्डविंग, छोटे ग्रास ज्वेल, सर्वात मोठे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु ब्ल्यू मॉरमॉन, दुर्मिळ फुलपाखरे असल्याचेही त्या संसोधनात स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर २० प्रकारचे सस्तन प्राणी, ११८ प्रकारचे पक्षी, १६ प्रकारच्या सरपटणाऱ्या प्रजाती, २२ प्रकारचे मासे, ३ सहस्त्र पाद प्रजाती, ८० पतंग प्रजाती, ११० प्रकारचे कोळी असे आढळून आल्याचा संशोधन मुक्त संशोधकांच्या माध्यमातून मेरीचे अध्यक्ष मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, प्रा. डॉ. प्रतिमा पवार, प्रा. डॉ. नेहा बेंद्रे यांनी केले होते. १.०७ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे संशोधन करुन फुलपाखरु संवर्धन केंद्र राखीव करण्याबाबत शासनाकडे २०२१ मध्ये प्रस्ताव पाठवला होता. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास २०२२ ला अनुमती दिली होती. सातारा नगरपालिकेनेही बजेटमध्ये त्याच अनुषंगाने तरतूदही केली गेली. मात्र, हेच फुलपाखरु राखीव संवर्धन केंद्र कसे असेल, कुठे असेल त्याबाबत अद्याप काहीच स्थानिकांना माहिती नाही. त्यामुळे उत्सुकता आहे.
- पाठपुरावा केल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल
सातारा नगरपालिकेने भरीव तरतूद याच फुलपाखरु राखीव संवर्धन केंद्राच्या अनुषंगाने ठेवलेली आहे. परंतु सातारा पालिकेकडे तशी कोणतीही मागणी केली नाही. मात्र, पाठपुरावा केल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल.
-वसंत लेवे, नगरसेवक
- तीन महिन्यापूर्वीच आराखडा सादर
फुलपाखरु राखीव संवर्धन केंद्राबाबतचा व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला. जैवविविधता कशी जपली जाईल, पर्यटन वाढीसाठी काय करता येईल. नैसर्गिक हानी कमी होईल कशी याचा अभ्यास करुन तो शासनास सादर केला. -सुनील भोईटे, मेरीचे अध्यक्ष