मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी कुतूहल
केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट : पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही करणार चर्चा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्त्व बदलाची चर्चा रंगलेली असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यापाठोपाठ बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील दिल्लीला रवाना होत आहेत. राज्यातील विविध योजनांसंबंधी ते देखील अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असले तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याने कुतूहल निर्माण झाले आहे.
राज्यातील पाणीपुरवठा योजनांसह विविध योजनांबाबत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी डी. के. शिवकुमार मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. गुरुवार 10 जुलै रोजी दिल्लीत एआयसीसीच्या मुख्य सचिवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही सहभागी होणार आहेत.
म्हैसूर दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हैसूरमध्ये एअरो शोचे आयोजन करण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. बुधवारी सायंकाळी 4:30 वाजता ते संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन विनंती करणार आहेत.
सुरजेवाला घेणार दिल्लीत बैठक
10 रोजी राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला हे नवी दिल्लीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतील. दोन टप्प्यात कर्नाटकातील काँग्रेस आमदारांची जाणून घेतलेल्या मतांविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. यावेळी राज्यातील सात-आठ निगम-महामंडळांवरील नेमणुका, पक्षसंघटना, सरकारच्या कार्यपद्धतीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.काँग्रेस पक्षाच्या ओबीसी समितीच्या अध्यक्षांबाबत चर्चा झाली आहे. पक्षसंघटनेच्या बाबतीत बैठक होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी नेत्यांची बैठक 15 जुलै रोजी बेंगळूरमध्ये होणार आहे. सिद्धरामय्या हे मागासवर्गातील प्रभावी नेते आहेत. ते काँग्रेसच्या मागासवर्ग समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरातील बैठक होणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्रिपद रिक्त नाही!
मुख्यमंत्रिपदासाठी काही आमदारांचा पाठिंबा असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता डी. के. शिवकुमार यांनी, सध्या मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही, असे स्पष्ट केले.