सुवर्ण विधानसौध परिसरात आजपासूनच जमावबंदी
तीन किलोमीटर परिघाचा समावेश : पाचहून अधिक जणांच्या फिरण्यावरही निर्बंध
बेळगाव : सुवर्ण विधानसौधमध्ये दि. 8 ते 19 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौधच्या तीन किलोमीटर परिघामध्ये सोमवार दि. 1 डिसेंबरपासून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी हा आदेश जारी केला आहे. दि. 1 डिसेंबरपासून 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये सुवर्ण विधानसौधच्या तीन किलोमीटर परिघामध्ये जमावबंदी असणार आहे. अधिवेशनाच्या काळात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, निदर्शने करणाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. केवळ परवानगी घेतलेल्यांनाच आंदोलन करता येणार आहे.
यंदा अधिवेशनाच्या आठ दिवस आधीपासूनच जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुवर्ण विधानसौधपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत मोर्चे, मिरवणुका, जाहीर सभा घेण्याबरोबरच पाचहून अधिक जणांनी गटागटाने फिरू नये, असे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या परिसरात प्रक्षोभक घोषणा देणे, एखाद्या व्यक्तीचा अपमान होईल असे चित्र, चिन्ह, प्रतिकृती दाखविण्यावरही बंदी असणार आहे. सुवर्ण विधानसौध परिसरात लाठी, तलवार, गदा, भाला, बंदूक, चाकू आदी शस्त्रs घेऊन फिरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात दगड किंवा स्फोटके, फटाके घेऊन जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या परिसरात दगड किंवा दगडफेक करण्यासाठीची साधने घेऊन जाण्यासही बंदी असणार आहे. स्फोटके किंवा आक्षेपार्ह वस्तू कोणाकडे आढळून आल्यास संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
हा आदेश धार्मिक मिरवणुका, अंत्यसंस्कार आदींना लागू होणार नाही. लग्न किंवा इतर धार्मिक कारणांसाठी मिरवणूक काढताना कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का लागणार नाही, यासाठी नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निदर्शने करणे, रास्ता रोको करणे किंवा रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा कार्यातील वाहने अडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या काळात पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय ड्रोनचा वापर करण्यावरही निर्बंध असणार आहे.
दिल्ली स्फोटांमुळे सतर्कता
नवी दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामुळे देशभरात सतर्कता बाळगण्यात आली आहे. याबरोबरच आजवरच्या अधिवेशनाच्या काळात घडलेल्या अप्रिय घटनांसंबंधी 27 प्रकरणे दाखल झाली आहेत. 73 अधिकारी व पोलीस जखमी झाले आहेत. या घटनात 21 नागरिकही जखमी झाले आहेत. 6 लाख 23 हजार 300 रुपये किमतीच्या मालमत्तेची नासधूस झाली आहे. टोलनाक्यावरून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावर रोज सुमारे 16,916 हून अधिक वाहनांचा संचार होतो. या गोष्टींचा विचार करून 1 डिसेंबरपासूनच जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.