मणिपूरच्या 3 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू
इम्फाळ देखील सामील : राज्यात 6 दिवस इंटरनेट बंद: पोलीस महासंचालकांना हटविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमध्ये जारी असलेल्या हिंसेदरम्यान तीन जिल्हे इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व आणि थौबलमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राज्यात 6 दिवस इंटरनेटसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ड्रोन हल्ल्यानंतर मैतेई समुदायाच्या लोकांनी 8 आणि 9 सप्टेंबर रोजी राजभवन आणि मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर निदर्शने केली होती. 9 सप्टेंबर रोजी निदर्शक विद्यार्थ्यांनी राजभवनावर दगडफेक केली होती, यानंतर पोलिसांनी अश्रूधूर अन् रबरी बुलेटचा मारा केला होता. यात 20 हून अधिक जण जखमी झाले होते. तर सोमवारी रात्री उशिरा महिलांनी मशाल मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता संचारबंदी लागू केली आहे. तर केंद्र सरकारने 2 हजार जवान असलेल्या सीआरपीएफच्या दोन बटालियन राज्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही पोलीस महासंचालक, राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागारांना हटविण्याची मागणी केली आहे. तसेच सीआरपीएफचे माजी महासंचालक कुलदीप सिंह यांच्या नेतृत्वात स्थापन युनिफाइड कमांड राज्य सरकारकडे सोपविण्याची मागणी केली असल्याचे विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या एम. सनाथोईने सांगितले आहे.
इंफाळमध्ये सोमवारी शेकडोंच्या संख्येत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राजभवनावर दगडफेक केली होती. मैतेई समुदायाचे हे विद्यार्थी मणिपूरमधील हिंसक घटनांप्रकरणी 8 सप्टेंबरपासून निदर्शने करत आहेत. रविवारी किशमपटच्या टिडिम मार्गावर 3 किलोमीटरपर्यंतच्या रॅलीनंतर निदर्शक राजभवन आणि मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पोहोचले होते. मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन सोपविण्याची त्यांची इच्छा होती. सोमवारी सुरक्षा दलांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली. तरीही विद्यार्थी रस्त्यावर निदर्शने करत राहिले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर रस्त्यावर बसून राहू असे विद्यार्थ्यांचे सांगणे होते. यादरम्यान सुरक्षा दलांसोबत त्यांची झटापट देखील झाली.
ड्रोन हल्ल्यांचा विरोध
हे विद्यार्थी मैतेई भागांमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यांचा विरोध करत आहेत. केंद्रीय सुरक्षा दल याप्रकरणी ठोस पाऊल उचलत नसल्याचा आरोप निदर्शकांनी त्यांना राज्याबाहेर काढण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच राज्यातील 60 पैकी 50 मैतेई आमदारांना स्वत:ची भूमिका स्पष्ट करा किंवा राजीनामा द्या असा इशारा निदर्शकांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांकडे नियंत्रण सोपवा
राज्यात युनिफाइड कमांडची धुरा मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांच्याकडे सोपविण्यात यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. म्हणजेच केंद्र आणि राज्याच्या सुरक्षा दलांवरील नियंत्रण मुख्यमंत्र्यांकडे असावे असे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस महासंचालक आणि सुरक्षा सल्लागाराल हटविण्याची मागणीही ते करत आहेत.
11 दिवसांत 8 बळी
मणिपूरमध्ये हिंसा जारी असून मागील 11 दिवसांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कुकीबहुल कांग्पोक्पीच्या थांगबू गावात मैतेई समुदायाशी संबंधित संघटनेने गोळीबार केला होता, यात नेंगजाखल लहुगडिम यांचा मृत्यू झाला आहे. विष्णूपूरच्या सुगनू गावावरही हल्ला झाला आहे. विष्णूपूर हे मैतेईबहुल इंफाळ आणि कुकीबहुल चुराचांदपूर मधील बफर झोन आहे. तेथे मैतेई लोकांचे प्रमाण अधिक आहे, परंतु सुगनू गावात कुकी लोकांची संख्या अधिक आहे, हे गाव चुराचांदपूरला लागून आहे.