महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बरे झाले, निलंबित केले!

06:07 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत वादग्रस्त माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्या पितृतुल्य पाठबळावर उभे राहिलेल्या संजय सिंह यांच्या पॅनलने घवघवीत यश मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या महिलेला पराभूत करून ते विजयी झाले. या घटनेवर प्रतिक्रिया म्हणून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणारी एकमेव महिला कुस्तीगीर साक्षी मलिकने दु:खीत अंतकरणाने क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती घेतली. तर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने आपल्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत केला आहे. पद्म पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दारात फुटपाथवर ठेवून देण्याची वेळ देशातील या नामवंत खेळाडूवर आली.  साक्षीसह अर्धा डझन महिला कुस्तीपटूंनी ब्रजभूषण सिंह याच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. महासंघात असलेली त्याची एकहाती सत्ता त्याला असे उद्दाम वर्तन करण्यास साथ देत असल्याने भारतीय पदक विजेत्या आघाडीच्या कुस्तीगीरांनी त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. केंद्र सरकारने प्रदीर्घकाळ या आंदोलनाची दखलच घेतली नाही. खूपच बदनामी झाल्यानंतर चौकशी सुरू केली. भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक लावण्याचे आश्वासन देऊन ब्रजभूषण याला या महासंघापासून दूर ठेवण्याचे आश्वासन क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारने केलेल्या या घोषणा केवळ ‘ठंडा करके खाव‘ अशा प्रकारच्या ठरल्या. वेगवेगळ्या कारणांमुळे कुस्ती महासंघाची निवडणूक पुढे ढकलली गेली. दोन न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. जागतिक कुस्ती संघटनेने भारतावर फुली मारली. अशाप्रकारे वेळ काढत काढत ब्रजभूषण सिंह यांनी आपले पॅनल भक्कम केले आणि आपल्याच हस्तकाला या पदावर बसवले.  लोकशाही पद्धतीने ही निवड प्रक्रिया झाली असल्याने ती मान्य करा, असे या खेळाडूंना सांगितले जाऊ लागले होते. पण, खरा प्रश्न देशातील महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेचा आणि आत्मसन्मानाचा आहे. महिला खेळाडू ज्या कळकळीने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत होत्या, त्या खोट्या किंवा चुकीचे मानणे शक्य नाही.  देशातील ऑलिंपिक पदक विजेती एकमेव महिला कुस्तीपटू असा आरोप करत आहे आणि देशातील नामवंत खेळाडू रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, हे लक्षात घेतले तर त्या आंदोलनावर शंका घेता येणार नाही. रविवारी याबाबत क्रीडा मंत्रालयाने देशभरातील प्रतिक्रिया विचारात घेऊन हे नवनिर्वाचित मंडळ निलंबित केले आहे. या निर्णयाचे महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करता स्वागतच केले पाहिजे. कारण,  पुन्हा निवडून आल्यानंतर ब्रजभूषण सिंह ज्या  साळसुदपणाने वक्तव्य करत होता, त्यावरून आपला सगळा कारभार अगदी शंभर टक्के बरोबर होता, असे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. साक्षी आणि बजरंग यांच्या खेळ आणि पुरस्कार त्यागाच्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली. अर्थात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर पद्म पदक ठेवल्यामुळे एक मोठा वर्ग बजरंगच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करणार हे स्पष्ट आहे. नाराजी खूप मोठ्या वर्गाची असली तरी त्या वर्गाने सुद्धा पंतप्रधानांवरील प्रेमापेक्षा भारतातील क्रीडापटूंच्या अवहेलनेकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुस्ती क्षेत्रातील महिलांच्या बाबतीतील गैरवर्तनाला वाचा फुटली असली तरी भारतातील अनेक क्रीडा संघटनांच्या कारभारी मंडळीकडून त्या त्या क्षेत्रातील महिला खेळाडूंचे शोषण केले जाते हे उघड गुपित आहे. कुस्तीपटू महिलांनी ते उघड करण्याचे धाडस दाखवले. मात्र अनेक संघटनांच्या प्रमुखांच्या भवितव्य धोक्यात आणण्याच्या धमकीपुढे महिला खेळाडूंना नमते घ्यावे लागते.  शोषणाला बळी पडावे लागते. जेव्हा कधी देशात याबाबतीत गांभीर्याने शोध कार्य सुरू होईल, तेव्हा या सगळ्या खेळातील काळे सत्य उघड झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्षातील काही प्रभावी मंडळींना आपल्या एका बलिष्ठ खासदाराला दुखवायचे नाही, त्याच्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय गणिते बदलू शकतात म्हणून सांभाळून घेण्याचे धोरण क्रीडा मंत्रालयाने राबवले अशी टीका केंद्रावर होत होती.  त्याचीच पुनरावृत्ती ठिकठिकाणी झाली. निवडणुकांमध्ये जितका वेळकाढूपणा झाला, त्याचा परिणाम विरोध करणारे खेळाडू एकटे पडण्यात झाला. खेळाडू आव्हान देऊ शकत नाही हे वास्तव केवळ कुस्तीच्या बाबतीतच खरे नव्हे. क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या पदावर राजकारण्यांनी मांड ठोकलेली असल्यामुळे त्यांच्या तंत्रानुसार त्या त्या खेळाचा कारभार चालतो. त्याला कुस्ती पासून कब•ाrपर्यंत कुठलाही खेळ अपवाद राहिलेला नाही. सिंह यांच्या टीमचा विजय हा भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा झटका होता. जर कुस्तीच्या क्षेत्रातून हे पॅनेल बाजूला फेकले गेले असते तर क्रीडा प्रकारांमधील गैरकृत्यांना वाचा फुटली असती. मात्र तसे होऊ शकले नाही. परिणामी केवळ कुस्तीतील विरोधाचा आवाज दडपला गेला असे नव्हे तर सर्वच क्रीडा क्षेत्रातील विरोधाला चिरडले गेले. पण, केंद्राने हे निलंबनास्त्र उगारून दिलासा दिला आहे अर्थात न्यायालयाचे दरवाजे ठोठावून लोकशाहीच्या नावाने गळा काढून क्रीडा संघटनेत  हुकूमशाही करणारे हे लोक न्याय मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करणार यात शंकाच नाही. पण, न्यायालयानेही आता या लोकशाहीच्या नावाने राबविल्या जाणाऱ्या झुंडशाहीचे अंतरंग जाणण्याची आणि क्रियाशील होण्याची वेळ आली आहे. साक्षी मलिकने इथेपर्यंत येण्यासाठी जे कष्ट घेतले त्या सगळ्याची जाण देशाने ठेवली पाहिजे. बजरंगला तयार करण्यासाठी त्याच्या वडिलांची आणि कुटुंबाची जी ससेहोलपट झाली होती, जो त्रास आणि हाल सोसून त्यांनी हा पैलवान घडवला होता, त्याचा पद्म पुरस्कार परत करताना त्या संपूर्ण कुटुंबाची अवस्था काय झाली असेल? हे जाणले पाहिजे. महाराष्ट्रात कुस्तीगीर परिषदेत  फूट पाडून सिंह यांनी कुस्ती महासंघाला चालना दिली आहे. त्यामुळे अलिकडे मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची पुरती अवहेलना झाली आहे. ब्रजभूषण यांच्या नेतृत्वाखाली टीम जिंकल्याने सर्वच क्रीडा प्रकारातील झुंजार खेळाडूंचा  विरोधातला आवाज मात्र  पायाखाली चिरडला जाईल, असे वातावरण होणे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खूपच घातक होते. त्याच्यावर केंद्राने तात्पुरता तोडगा काढला हा दिलासाही खूप आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article