सर्व आजारांवर इलाज, पण द्वेषावर नाही!
विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांचे खासदार विश्वेश्वर हेगडेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर
बेंगळूर : आपल्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या खासदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप माझ्या लक्षात आहेत. सर्व आजारांवर इलाज आहे, पण द्वेषावर नाही. जर कोणाला काही शंका असतील तर मी उद्या (गुरुवार) कार्यालयात असेन. काही विचारायचे असेल तर लेखी स्वरुपात द्यावे. त्यावर सकारात्मक उत्तर देईन, अशी टिप्पणी सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी केली. मंगळूरमध्ये बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कुठेही बसून आरोप केले तर उत्तर देता येईल का? मी संवैधानिक सभाध्यक्ष पदावर अहे. माझे कर्तव्य पार पाडत आहे. माझ्यावर आरोप हे नवीन नाहीत. मी आमदार असल्यापासूनच असे आरोप ऐकत आलो आहे. कोणत्याही चौकशीला मी तयार आहे, असेही ते म्हणाले.
खासदार कागेरी यांनी कोणते आरोप केले?
विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार देईन, से खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी म्हटले होते. सभाध्यक्षपद आरोपमुक्त असले पाहिजे. त्यामुळे खादर यांना सभाध्यक्ष पदावरून हटवावे. राज्य सरकारने त्यांच्यावरील आरोपांसंबंधी चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. विधानसभेच्या प्रवेशद्वारावर रोझवूड लाकडावर नक्षीकाम असणारी चौकट बसविण्यात आली आहे. आमदार भवनमध्ये अनेक सुविधांसाठी कोट्यावधी रुपये वाया घालविण्यात आले आहेत. मर्जीतील लोकांना खरेदीचे कंत्राट देण्यात आले आहेत. सभागृहात नवीन टीव्ही, एआय मॉनिटर सिस्टम, सर्व आमदारांना घड्याळांचे वितरण, आमदारांना विश्रांतीसाठी रिक्लायनर खुर्च्या अशा अनेक कारणांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पुस्तक मेळाव्याच्या नावाने 4.45 कोटी रु. खर्च करण्यात आले. सभाध्यक्षांना हे करण्याची गरज होती का?, असा प्रश्न उपस्थित करून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.