For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र सरकारच्या मनमानीला आवर घाला

11:23 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्र सरकारच्या मनमानीला आवर घाला
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडे मोर्चाद्वारे दलित संघर्ष समितीची मागणी : राष्ट्रपतींच्या नावेही दिले निवेदन

Advertisement

बेळगाव : ईडी, आयटी, सीबीआय यासारख्या उच्च तपास यंत्रणांना केंद्रातील भाजप सरकार हाताशी धरून राजकीय लाभ उठवत आहे. भाजप सरकारच्या या कृतीला पायबंद घालावा, अशी मागणी राज्य दलित संघर्ष समिती जिल्हा शाखेने केली आहे. जिल्हा शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी बुधवारी अर्धनग्न अवस्थेत मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन राष्ट्रपतींच्या नावे निवेदन दिले. केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येऊन दहा वर्षे उलटली. या सरकारने आपल्या सत्ताकाळात लोकशाहीला पायदळी तुडवण्याचेच काम केले आहे. भाजप सरकार नसलेल्या राज्यात अस्थिरता माजवून तेथील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. ईडी, आयटी, सीबीआय या संस्था नि:पक्षपातपणे तपासकार्य करीत असल्या तरी केंद्रातील भाजप सरकार या संस्थांना हाताशी धरून स्वत:च्या लाभासाठी उपयोग करीत आहे. भाजप सरकार नसलेल्या राज्यात अराजकता माजवण्याचे कारस्थानही केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.

भाजपाचे मनमानी राजकारण

Advertisement

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार चोखपणे राज्यकारभार करत असले तरी मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना लक्ष्य करून त्यांना पायउतार होण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. केंद्रात स्थापन झालेले भाजप सरकार हे काही पक्षांचा आधार घेऊनच आहे. स्वबळावर सरकार स्थापन करणे भाजपला शक्य झालेले नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. टेकू घेऊन सत्तेवर येत आता मनमानी राजकारण करीत जनतेला त्रास देण्यात धन्यता मानत आहे.

केंद्राची राजकीय पद्धती राज्यांना डोकेदुखी

एकूणच केंद्र सरकारची राजकीय पद्धती देशातील अनेक राज्यांना डोकेदुखी ठरली आहे. केंद्र सरकारच्या कृतीचा राज्यभरातील दलित संघर्ष समिती तीव्र निषेध करीत आहे. बुधवारी राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे. बेळगावात झालेल्या मोर्चालाही दलित बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्रातील सरकारने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जनतेला स्वास्थ्य मिळवून देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी सर्वसामान्यांचीही मागणी आहे, असे निवेदनात म्हटले आहे. मोर्चामध्ये जिल्हा संचालक श्रीकांत तळवार, जिल्हा संघटना संचालक संजय तळवलकर, मच्छिंद्र खांडेकर, कल्लाप्पा कांबळे, अविनय जातगार, फातिमा शेख, सईदा सनदी, रवी कांबळे, सचिन पुजारी, अनिल मोहिते, शिवानंद कांबळे, शंकर तिप्पगोळ, सुंदरव्वा कट्टीमनी, प्रकाश मर्डी यासह अनेकांचा सहभाग होता.

Advertisement
Tags :

.