साबरमतीतील क्रूज बोटीवर कमिन्सचे विश्वचषकासह पोझ
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयसीसी क्रिकेट विश्वचषक रविवारी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सोमवारी अहमदाबादमधील साबरमती नदीतील रेस्टॉरंट असलेल्या क्रूज जहाजावर चषकासह छायाचित्रांसाठी पोझ दिल्या. अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. जगातील कोणत्याही अन्य संघाला इतक्या वेळा ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
कमिन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी सकाळी साबरमती नदीच्या काठावर पोहोचला आणि मग विश्वचषकासह फोटोशूटसाठी नदीतील ‘अक्षर रिव्हर क्रूज’ नावाच्या तरंगत्या रेस्टॉरंटमध्ये गेला. आयसीसीने अधिकृत फोटोशूटसाठी साबरमती नदीसारख्या विख्यात ठिकाणाची निवड केली ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कमिन्सने क्रूजच्या वरच्या डेकवर चषकासह विविध पोझ दिल्या. त्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थही देण्यात आले, असे क्रूज रेस्टॉरंट चालविणाऱ्या अक्षर ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुहाग मोदी यांनी सांगितले.
‘आयसीसी’च्या अधिकृत छायाचित्रकाराने काढलेल्या काही छायाचित्रांमध्ये हा 30 वर्षीय वेगवान गोलंदाज अटल पुलाच्या पार्श्वभूमीवर डेकवर विश्वचषकासह उभा असल्याचे दिसले. सुहाग मोदी यांनी सांगितल्यानुसार, कमिन्सने जहाजावर मुलाखतही दिली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधाराने ‘वा, किती छान जागा आहे’, असेही उद्गार यावेळी काढले. ऑस्ट्रेलियन कर्णधार या स्थळाचे सौंदर्य पाहून खूप प्रभावित झाला. आम्ही त्याला साबरमती आणि अटल पुलाविषयी माहिती दिली. त्याने आम्हाला सांगितले की, ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बरचे या ठिकाणाशी बरेच साम्य आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.