कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Cultural Kolhapur: कोल्हापूरचे पोलीस आणि त्यांच्या हातातला सोटगा..

05:41 PM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेव्हाही हत्यारी आणि बिनहत्यारी अशी वर्गवारी पोलिसांमध्ये होती

Advertisement

By : सुधाकर काशीद 

Advertisement

कोल्हापूर : आजच्या आधुनिक पोलीस दलामध्ये शस्त्रसज्ज पोलीस आपण पहात असतो. अगदी साध्या काठीपासून ते अत्याधुनिक एके 52 सारखी हत्यारे त्यांच्याकडे असतात. संस्थान काळामध्येही पोलिसांकडे त्याकाळाप्रमाणे हत्यारे होती. अगदी ढाल तलवारीसारखी. तेव्हाही हत्यारी आणि बिनहत्यारी अशी वर्गवारी पोलिसांमध्ये होती. त्यांच्याकडे असणारा सोटगा मात्र वेगळाच असे. त्याच्या एका दणक्यातच भलेभले गुन्हेगार एकदम गार पडत. आणि आपला गुन्हा कबुल करत, असे सांगितले जाते....

कोल्हापूर जिह्यात प्रत्येक चार मैलावर एक किंवा 1258 लोकामागे एक पोलीस अशी 1881 सालची व्यवस्था होती. पोलीस दलाचा वर्षाचा खर्च 63508रुपये होता. एकूण पोलिसापैकी 306 मराठा, 100 मुसलमान, 25 ब्राह्मण, आठ लिंगायत, आठ रजपूत, आठ कोळी, पाच धनगर, चार मांग, तीन जैन, तीन न्हावी, तीन भोई, दोन महार, एक सीकेपी, एक गोसावी, एक वाणी, एक शिंपी, एक कुंभार, एक खाटीक, एक धोबी व एक वडर अशी त्यांची जातनिहाय संख्या होती.

या 1258 पोलिसांपैकी 50 जण कवायत शिकलेले होते. त्यांच्याकडे बंदुका, फौजदार व जमादाराकडे तलवारी आणि बाकीच्या पोलिसांकडे सोटगा नावाचे हत्यार होते. सर्व शिपायांपैकी फक्त 54 जणांना लिहितावाचता येत होते. बाकीच्यांना लिहितावाचता येण्यापुरतं तरी शिकवण्यासाठी एका पोलिसाची नियुक्ती होती.

1881 सालची कोल्हापुरातील पोलीस दलाची ही स्थिती त्या काळात पुरेशी होती. त्यावेळी खेड्यात स्वतंत्र पोलिसांची नियुक्ती नव्हती. मुलकी पाटलाकडेच पोलीस पाटलाचं काम व त्याच्या हाताखाली दोन सनदी शिपाई होते. भटक्याच्या पालावर पोलिसांची सतत नजर असायची. संशयीतास रोज चावडीत हजेरीची सक्ती व गाव सोडताना पोलीस पाटलाची परवानगी घ्यावी लागत होती.

तेच सनदी पाटील व वरिष्ठ मुलकी कामगार पोलीस खात्याचाच एक भाग होते. शेतसनदींना लष्करातील नोकरीसाठी जमिनी दिल्या होत्या. 1844 साली कोल्हापूर संस्थान ब्रिटिशांच्या देखरेखी आले. शेतसनदींना पोलिसांचे काम दिले गेले. त्यांनी चावडीत झोपावे.

इतर पोलिसांनी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर बंदोबस्त ठेवावा व हुकूम येईल तेव्हा सर्वांनी एकदम हजर व्हावे, असे काम खेड्यातील शेतसनदी पोलिसांच्या कडे सोपवले गेले होते. पोलीस पाटलांची खेड्यातील पोलिसांवर हुकूमत असे. संशयित गुन्हेगाराच्या हजेरीचे काम त्यांच्याकडे होते. पाटलांच्या वर शेकदार या पदाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण असे.

प्रत्येक शेकदाराकडे ठराविक खेड्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी होती. शेकदारावर पेट्यातील मामलेदाराचे नियंत्रण होते. कोठे दंगाधोपा झाला तर खेड्यातील स्वार मामलेदारास वर्दी देण्यासाठी रवाना होत असे. ही वर्दी एका खेड्यातील घोडेस्वार दुसऱ्या खेड्यातील घोडेस्वारास व तो तिसऱ्या खेड्यातील घोडेस्वारास वर्दी देत असे.

अशा पद्धतीने संदेश दिले जात होते. नंतर दंगाधोपा झालेल्या ठिकाणी पोलीस ताफा जात असे. प्रत्येक पेट्यास एक पोलीस कारकून व दहा पोलीस घोडेस्वार होते. ते आठ महिने प्रत्येक खेड्यातून फिरत व मामलेदारास आपला रिपोर्ट कळवत. ढाल व तलवारही हत्यारे घोडेस्वारांकडे होती.

कोल्हापूर शहराच्या बंदोबस्तासाठी एक नाईक व 29 शिपाई होते. या उलट पन्हाळा पेट्यास 2 नाईक व 25 शिपाई होते. लुटारूंचे वास्तव्य पन्हाळा परिसरातील डोंगरदऱ्यात जास्त, म्हणून तेथे बंदोबस्त जास्त होता. हळूहळू शेकदार, पोलीस कारकून ही पद्धत बंद झाली. व प्रत्येक पेट्यावर एक फौजदार किंवा चीफ कॉन्स्टेबल नेमले गेले.

मामलेदाराच्या नियंत्रणाखालील शिपाई फौजदाराच्या नियंत्रणात दिले गेले. पोलीस यंत्रणेवरील न्यायाधीशाचे नियंत्रण काढून चीफ पोलीस ऑफिसर हे नवीन पद निर्माण करण्यात आले. 1910 साली जिह्यात पोलीस खात्यात अधिकाऱ्यांसह 780 पोलीस होते. 1941 मध्ये छत्रपती महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ राजाराम रायफल्सची स्थापना करण्यात आली.

1948 मध्ये हा विभाग मुंबई राज्याच्या पोलीस दलात समाविष्ट केला. 1944 मध्ये जिह्यात 21 अधिकारी व 977 पोलीस होते. 1948 ला हत्यारी व बिन हत्यारी अशी पोलिसांची विभागणी केली व संपूर्ण राज्याची पोलीस यंत्रणा बदलण्यात आली. त्याच प्रकारे कोल्हापूर जिह्यातील यंत्रणाही राबवली गेली किंवा त्याच्यात फेरबदल केले गेले तरी संस्थानच्या पोलिसांचा दबदबा वेगळाच हेता.

सोटग्याचा फटका...

पोलिसांच्या हातातील सोटगा पोलिसांचे निम्मे काम करत असे. हा सोटगा म्हणजे म्हणजे धड त्याला काठीही म्हणता येत नसे. पण या सोटग्याचा फटका कमरेवर, मांडीवर किंवा शीटवर बसला तर कळवळावेच लागे. मात्र या सोटग्याचा वळ शरीरावर कोठेही उठत नसे. त्यामुळे पोलिसांनी चावडीत नेऊन बडवले, अशी तक्रार कोणाला करता येत नव्हती. त्यामुळे सोटग्याच्या भितीने गुन्हा न करणारा आरोपीही आपण गुन्हा केला म्हणून कबूल होत होता आणि सोटग्याचा मार वाचवत होता.

Advertisement
Tags :
(Mumbai)@KOLHAPUR_NEWS#cultural#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacultural kolhapur
Next Article