For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ले-जानेवाडी रस्त्यावर अंधश्रद्धेचा कळस

08:53 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्ले जानेवाडी रस्त्यावर अंधश्रद्धेचा कळस
Advertisement

करणीबाधेच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप : समाजातील अंधश्रद्धा दूर करून जागृती करण्याची गरज

Advertisement

वार्ताहर /किणये

गेल्या दोन दिवसांपासून होळी पौर्णिमेनिमित्त तालुक्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. एकीकडे ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात सारेच दंग असतात आणि अशातही काही अंधश्रद्धाळू लोक आजही करणीबाधेच्या पाठीमागे लागलेले पहावयास मिळत आहेत. याच पौर्णिमेच्या दिवशी रणकुंडये क्रॉस, कर्ले, जानेवाडी रोडवर करणीबाधेचा प्रकार करून विविध प्रकारचे साहित्य टाकण्यात आले. यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या विज्ञान आणि आधुनिक युगातही करणीबाधा या प्रकारावर काहीजण विश्वास ठेवतात. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. समाजातील काही दृष्ट प्रवृत्तीच्या माणसांनी रस्त्याच्या आजूबाजूला नारळ, गुलाल, लिंबू टाचणी, सुप, विविध प्रकारचे कपडे, भात, काळा कपडा असे साहित्य टाकले आहे. त्यामुळे साहजीकच सदर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.

Advertisement

हा सारा प्रकार कर्ले गावातील ग्रा. पं. सदस्य विनायक पाटील, वसंत सांबरेकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सर्पमित्र व अंधश्रद्धा निर्मूलनाचे आनंद चिठ्ठी यांना याबाबत माहिती दिली. आनंद चिठ्ठी यांनी प्रथमत: रणकुंडये क्रॉस येथील रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या करणीबाधेचे सर्व साहित्य जमा करून घेतले. त्यानंतर ते कर्ले-जानेवाडी या रस्त्यावर आले. त्या ठिकाणी तर सुमारे 25 हून अधिक नारळ टाकण्यात आले होते, लिंबू टाचणी, काळा कपडा असे साहित्य टाकण्यात आले होते. हे साहित्य त्यांनी आपल्या एका पिशवीमध्ये जमा केले. आपण या साहित्याचा खाण्यासाठी उपयोग करतो, असे सांगितले. समाजातून अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे. करणीबाधा करून एकमेकांचे वाईट करता येत नाही. त्यामुळे अशा प्रथा आणि परंपरा बंद झाल्या पाहिजेत, असे आनंद चिठ्ठी यांनी सांगितले.

असे प्रकार थांबले पाहिजेत...

रस्त्याच्या बाजूला भात टाकण्यात येतो त्यावर गुलाल घातला जातोय तसेच लिंबू वरती टाचण्या लावलेल्या असतात जनावरे हे खातात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात असे प्रकार होणे थांबले पाहिजेत, असे विनायक पाटील यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.