क्रिप्टो ट्रेडिंग कंपनीला तब्बल 384 कोटींना गंडा
नेब्लिओ टेक्नॉलॉजीसच्या कर्मचाऱ्याला अटक : बेंगळुरातील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरच्या बेळ्ळंदूर येथील क्रिप्टोकरेन्सी ट्रेडिंग कंपनी नेब्लिओ टेक्नॉलॉजीस प्रा. लि. कंपनी वॉलेट हॅक करून सुमारे 384 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठ सायबर फसवणूक आहे. या प्रकरणी व्हाईट फिल्ड सायबर क्राईम पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सायबर फसवणूक प्रकरणी पोलिसांनी नेब्लिओ टेक्नॉलॉजीस कंपनीचा कर्मचारी राहुल अगरवाल याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी किती जण सामील आहेत, याचा तपास जारी आहे.
19 जुलै रोजी अज्ञात व्यक्तीने कंनीचे क्रिप्टो वॉलेट हॅक करून 44 मिलियन युएस डॉलर्स (सुमारे 384 कोटी रु.) किमतीचे क्रिप्टो करेन्सी अज्ञात वॉलेटमध्ये ट्रान्स्फर केले आहेत, असा आरोप करत नेब्लिओ टेक्नॉलॉजीस प्रा. लि. चे उपाध्यक्ष (सार्वजनिक धोरण आणि सरकारी व्यवहार) हरदीप सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हरदीप सिंग यांनी दिलेलया तक्रारीच्या आधारे 22 जुलै रोजी व्हाईटफिल्ड येथील सीईएन पोलीस स्थानकात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत चोरी, गुन्हेगारी, विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी कंपनीचा कर्मचारी असून राहुल अगरवाल याला अटक करून अधिक चौकशीसाठी सायबर गुन्हे विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहे. कंपनीच्या अंतर्गत चौकशीतून अगरवालचा लॅपटॉप हॅक झाल्याचे आढळून आले, अशी माहिती हरदीप सिंग यांनी दिली. चौकशीवेळी राहुल अगरवालने मागील वर्षी कंपनीचा लॅपटॉप आणखी एका पार्ट टाईप कामासाठी वापरल्याची कबुली दिली आहे. त्यातून त्याने 15 लाख रु. कमावले होते.
हरदीप सिंग यांनी आरोप केला आहे की, कंपनीने दिलेला लॅपटॉप अन्य पार्ट टाईम कामासाठी वापरणे हे कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन आहे. राहुलने अज्ञान व्यक्तीसोबत मिळून हॅकिंग केल्याचा संशय आहे.