गुजरातमध्ये 6 वर्षीय मुलीसोबत घडले क्रौर्य
आरोपी राम सिंह 3 मुलांचा पिता
वृत्तसंस्था/ राजकोट
गुजरातच्या राजकोटमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 6 वर्षीय मुलीचे अपहरण करत तिच्यावर एका 30 वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केले आहेत. स्वत: एका 3 अपत्यांचा पिता असलेल्या आरोपीने मुलीवर बलात्कार करण्यासोबत तिच्यासोबत अत्यंत क्रौर्यही केले आहे. पोलिसांनी आरोपी राम सिंहला अटक केली आहे. तर जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलीचे आईवडिल शेतात काम करण्यासाठी गेले असता राम सिंहने मुलीला उचलून एका निर्जन ठिकाणी नेले होते. तेथे तिने तिच्यावर बलात्कार केला, यावरच न थांबता त्याने तिच्यासोबत अत्यंत निर्दयी कृत्य केले आहे. तर दुसरीकडे कामावरून परतल्यावर मुलगी दिसून न आल्याने आईवडिल तिचा शोध घेऊ लागले. काही अंतरावर मुलगी त्यांना रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळून आली. मुलीला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले, प्रकरणाची संवेदनशीलता पाहता पोलीसही सक्रीय झाले. 10 पथकांची स्थापना करत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. गावातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले गेले. पोलिसांनी दूरसंचार कंपन्यांकडुन डाटा मिळवत संबंधित वेळेत किती मोबाइल फोन घटनास्थळाच्या आसपास सक्रीय होते हे शोधून काढले.
पोलिसांनी 140 संशयितांची यादी तयार करत चौकशी केली. चौकशीनंतर 10 जणांची छायाचित्रे पीडितेला दाखविण्यात आली. यातील एका इसमाचे छायाचित्र तिने ओळखले. यानंतर पोलिसांनी 30 वर्षीय राम सिंहला अटक केल्याचे राजकोट ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले आहे.