पाककडून मदतीच्या नावाखाली क्रूर थट्टा
श्रीलंकेला पाठविली एक्स्पायर्ड सामग्री
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दित्वा’मुळे आलेला पूर तसेच भूस्खलनामुळे झालेल्या हानीदरम्यान पाकिस्तानचे ‘मानवीय सहाय्य’ एका आंतरराष्ट्रीय वादाचे कारण ठरले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला पाठविलेली मदतसामग्रीतील बहुतांश वस्तू एक्स्पायर्ड होते. यामुळे श्रीलंकेतील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि विदेश विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला ‘गंभीर चिंते’चा विषय ठरत पाकिस्तानकडून औपचारिक स्पष्टीकरण मागितले आहे. सोशल मीडियावर याला ‘सहाय्यक कूटनीतिची थट्टा’ ठरवत व्यापक स्तरावर पाकिस्तानला लक्ष्य केले जातेय.
चक्रीवादळ ‘दित्वा’ने 28 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेत मोठी हानी घडवून आणली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे 132 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 176 जण बेपत्ता आहेत. तर सुमारे 78 हजार लोक विस्थापित झाले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे पूर्ण देश हादरून गेला असून खासकरून कोलंबोच्या आसपासच्या भागांमध्ये अधिक नुकसान झाले आहे.
या आपत्तीदरम्यान पाकिस्तानने ‘बंधुभावा’चा दावा करत तत्काळ सहाय्याची घोषणा केली होती. 29 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी नौदलाचे जहाज कोलंबो बंदरावर पोहोचले, ज्यात अनेक टन मदतसामग्री होती, यात भोजन पाकिटे, औषधे, प्रथमोपचार किट, अन्नधान्य, तंबू आणि अन्य आवश्यक वस्तू सामील होत्या.
परंतु श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी या सामग्रीची तपासणी केली असता अनेक पाकिटांवर 2024 मधील एक्स्पायरी डेट आढळून आली. वैद्यकीय पुरवठा आणि खाद्यपाकिटेही खराब आढळून आली. यामुळे ही सामग्री आपत्तीग्रस्तांसाठी बेकार ठरली आहे. या मदतसामग्रीतील बहुतांश वस्तू वापरासाठी कालबाह्या ठरल्या होत्या असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर या घटनेमुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान एक असहज राजनयिक स्थिती निर्माण झाली आहे.
भारताबद्दल पाकिस्तानचा खोटा दावा
श्रीलंकेतील नैसर्गिक आपत्तीच्या नावावर पाकिस्तानने भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने वस्तुस्थिती मांडत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला मदतसामग्री पाठविण्यासाठी हवाईक्षेत्राचा वापर करू देण्याच्या केलेल्या विनंतीवर भारताने त्वरित विचार केला आहे.
तर यापूर्वी हवाईक्षेत्राचा वापर करण्यास भारताने नकार दिल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता. भारताने सोमवारी संध्याकाळीच श्रीलंकेला मदतसामग्री पोहोचविण्याकरता पाकिस्तानच्या विमानाला स्वत:चे हवाईक्षेत्र वापरण्याची अनुमती दिली होती. पाकिस्तानकडून विनंती मिळाल्यावर केवळ साडेचार तासांत भारताने हा निर्णय घेतला होता.