For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रावण, रक्षाबंधन अन् गणेशोत्सवासाठी बाजारात गर्दी

11:42 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रावण  रक्षाबंधन अन् गणेशोत्सवासाठी बाजारात गर्दी
Advertisement

पूजेच्या साहित्यासह राख्यांच्या खरेदीची लगबग : उपवासाच्या पदार्थांच्या मागणीतही वाढ

Advertisement

बेळगाव : बाजारात श्रावण, रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. पूजेच्या साहित्याबरोबरच राख्या आणि गणरायाच्या साहित्याची खरेदी होत आहे. विशेषत: पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मेणसी गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. 5 ऑगस्टपासून श्रावणमासाला प्रारंभ झाला. सोमवारी रक्षाबंधन तर 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. त्यामुळे बाजारात हळूहळू गणरायाच्या तयारीची लगबग पाहावयास मिळत आहे. एकूणच रविवारी श्रावण, रक्षाबंधन आणि गणरायासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. विशेषत: फळ-फुलांबरोबर पूजेच्या साहित्याची मागणीही वाढू लागली आहे. त्याबरोबरच फळांनाही पसंती मिळत आहे.

बाजारपेठ बहरली

Advertisement

श्रावणमासाला प्रारंभ झाल्यापासून बाजारात पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी पूजेच्या साहित्याची खरेदी होऊ लागली आहे. उपवासाच्या पदार्थांनाही मागणी वाढत आहे. त्यामुळे श्रावणासाठी बाजारपेठ बहरल्याचे दिसत आहे. सोमवारी होणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात राखी खरेदीला बहर आला होता. पारंपरिक गोंड्यांच्या राख्यांबरोबर आकर्षक राख्यांची खरेदीही बहिणींकडून होत होती. पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली आणि इतर ठिकाणी बहिणींची राखी खरेदीसाठी वर्दळ वाढली होती. साधारण 5 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत राख्यांचा दर होता. गणेशोत्सवही जवळ येत असल्याने त्याच्या तयारीसाठी लगबग वाढू लागली आहे. बाजारात हळूहळू गणरायाच्या स्वागतासाठी लागणारे साहित्यही दाखल होऊ लागले आहे. लायटिंग, सजावट साहित्य, थर्माकोलचे मखर आदी पाहावयास मिळत आहेत. त्याचबरोबर गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, फटाके आणि गणरायाला प्रिय असलेले मोदक-मिठाईची आवकही वाढू लागली आहे. एकूणच रविवारी बाजारात श्रावण, रक्षाबंधन आणि गणरायासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

शहरात आज लाडक्या बहीण-भावांचे रक्षाबंधन

बहीण-भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण सोमवारी शहर परिसरात उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने बहिणींकडून भावांना ओवाळून रेशमी धागा बांधला जाणार आहे. त्यामुळे बहीण-भावांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात लाडक्या बहिणींची राखी खरेदीसाठी वर्दळ वाढली होती. अलीकडे नवनवीन राख्यांची क्रेझ वाढली आहे. सोने-चांदीबरोबर लहान मुलांसाठी लाईटिंगच्या राख्यांनाही पसंती दिली जात आहे. बाहेरगावी असणाऱ्या भावांसाठी बहिणींनी यापूर्वीच पोस्टाद्वारे राख्या पाठविल्या आहेत. सोमवारी बहीण भावांकडे किंवा भाऊ बहिणींकडे जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे घरोघरी बहिणींकडून भावांना आरती ओवाळून गोडधोड खाऊ घातले जाणार आहे. त्यामुळे बाजारात गुलाबजाम, पेढे आणि इतर गोड पदार्थांची खरेदी झाली. या पार्श्वभूमीवर रविवारी  बाजारात राखी खरेदीला वेग आला होता. घरोघरी, शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयांमध्ये रक्षाबंधन साजरे होणार आहे. या निमित्ताने शहरातही विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.