द्विदंती, द्विभूजी गणेश दर्शनासाठी गर्दी
कारवार : गणेशोत्सवाचे औचित्य साधून होन्नावर तालुक्यातील इडगुंजी येथील धार्मिक व पुरातन, प्रसिद्ध जगातील एकमेव द्विभूजी आणि द्विदंती गणपतीच्या दर्शनासाठी बुधवारी भाविकांचा महापूर लोटला होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने इडगुंजी येथील विनायक मंदिराची अतिशय आकर्षक सजावट केली होती. श्रींच्या दर्शनासाठी बुधवारी पहाटे 4 पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. इडगुंजी परिसरातील शेतकरी बांधवांकडून आपल्या शेतातील फुलं, फळफळावर आणून देवालय मंटप तयार करण्याची एक आगळीवेगळी आणि वैशिष्ठ्यापूर्ण सेवा बजावतात. यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय श्रीला 21 पदार्थांचा नैवेद्यही अर्पण केला जातो.
पाऊस असूनही अलोट गर्दी
इडगुंजीसह संपूर्ण होन्नावर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी असूनही जारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी धाव घेतली होती. कारवार जिल्हा पालकमंत्री व मासेमारी, बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य यांनीही इडगुंजी येथील गणपतीचे दर्शन घेतले. ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या बाप्पाचे जोरदार स्वागत केले. गणरायाला घरी आणण्यासाठी मोटार सायकल, रिक्षा, कार, ट्रॅक्टर, लॉरीचाचा वापर केला. काही जणांनी डोक्यावरुन गणपती आणणे पसंत केले. नोकरी, व्यवसायानिमित्ताने गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड, बेंगळूर आदी ठिकाणी वास्तव्य करून असलेले बहुतेक मूळ करवारवासीय अगोदरच आले आहेत. काही जण बुधवारी सकाळी दाखल झाले. अशा नागरिकांनी थेट बाजारपेठ गाठल्या. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वलहान, मोठ्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. ग्रामीण प्रदेशातून माटोळीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झालेले विक्रेते खरेदीमुळे सुखावल्याचे दिसून आले. गणेशोत्सवासाठी अन्य राज्यातून येथे दाखल होणाऱ्यांमध्ये गोव्यातून आगमन होणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. त्यामुळे कारवार ते मडगाव दरम्यान अतिरिक्त बस वाहतुकीची व्यवस्था केली होती.