राखी पाठविण्यासाठी पोस्ट कार्यालयांमध्ये गर्दी
बेळगाव : रक्षाबंधन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने परगावी असणाऱ्या भावांना राखी पाठविण्यासाठी बहिणींची लगबग सुरू आहे. बेळगाव पोस्ट कार्यालयात राखी पाठविण्यासाठी मंगळवारी मोठी गर्दी झाली होती. रजिस्टरसह स्पीडपोस्टाने राखी पाठविली जात होती. व्यवसाय, उद्योग, नोकरीनिमित्ताने अनेकजण परगावी स्थायिक झाले आहेत. परगावी असणाऱ्या भावांना पोस्टाद्वारे राखी पाठविली जात आहे. पोस्ट विभागाने राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफे तयार केले आहेत. या लिफाफ्यांमध्ये राखी घालून ती परगावी पाठविली जात आहे. मंगळवारी मुख्य पोस्ट कार्यालयासह इतर पोस्ट कार्यालयांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्पीडपोस्टाने जलदगतीने राखी पोहोचत असल्याने स्पीडपोस्ट करण्याकडे अधिक भर आहे. यावर्षी रक्षाबंधन दि. 9 ऑगस्ट रोजी आहे. त्यापूर्वी राखी भावाकडे पोहोचेल अशा पद्धतीने पोस्टाद्वारे पाठविली जात आहे. दरवर्षीप्रमाणे पोस्ट विभागाकडून ऑनलाईन राखी पाठविण्याचा उपक्रम सुरू आहे. महिलांना त्यांना आवडणारी राखी निश्चित करून पाठवायची आहे. यासोबत एक संदेश पत्र दिले जात आहे. पोस्टाच्या ऑनलाईन सेवांमध्ये या सेवेचा समावेश करण्यात आला आहे.