For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

06:59 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
Advertisement

दिव्यांचा लखलखाट, खरेदीला उधाण,

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

दिवाळी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीसाठी लागणारे फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र गर्दी होऊ लागली आहे.

Advertisement

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजारात शनिवारी खरेदीचा जोर वाढला होता. परतीचा पाऊस काहीसा कमी झाल्याने आबालवृद्धांसह बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली होती. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, कडोलकर गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आदी ठिकाणी गर्दी पाहावयास मिळाली. सोमवार दि. 28 रोजी वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी केवळ एकच दिवस मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. शनिवार बाजारचा दिवस त्यातच दिवाळीची खरेदी यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

दिवाळीसाठी लागणारे आकाश कंदील, पणत्या, मेणबत्त्या, रांगोळी, रांगोळीचे विविध डिझाईन्स, छाप, कापूस, वाती, उटणे, मातीचे दिवे, देवीचे मुकुट, तोरण, शुभ-लाभ, लक्ष्मीची पावले आदींची खरेदी होऊ लागली आहे. त्याबरोबरच बाजारपेठेत पूजेसाठी झेंडूची फुले, आंबोती आणि केळीची पाने दाखल झाली आहेत.

आज होणार पूजेच्या साहित्यासाठी गर्दी

सोमवारपासून दिवाळीला प्रारंभ होणार असल्याने रविवारी पूजेचे साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. विशेषत: झेंडूची फुले, ऊस, आंबोती आणि केळीच्या पानांची मागणी वाढणार आहे. त्याचबरोबर पूजेचे साहित्यही मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाणार आहे.

विविध भागातून नागरिक दाखल

दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. बेळगाव तालुक्यासह खानापूर, चंदगड, कोकण, गोवा आदी ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी खरेदी केली. यामुळे बाजारात शनिवारी उलाढालही वाढली होती. विशेषत: बाजारपेठेत खरेदी-विक्रीची लगबग दिसून आली.

इलेक्ट्रिक आणि वाहनांच्या शोरुममध्ये वर्दळ

साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या पाडव्याच्या शुभमुहुर्तावर नवीन वस्तू खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दुचाकांची शोरुम यासह सोन्या-चांदीच्या दुकानांमध्येही बुकिंगसाठी गर्दी होत आहे. येत्या दिवाळी सणात ही खरेदी होणार आहे.

व्यापारी दुकानांची स्वच्छता

बाजारात व्यापारी दिवाळीत लक्ष्मी पूजन करतात. या पार्श्वभूमीवर दुकानांची स्वच्छता केली जात आहे. प्रत्येक दुकानात पूजन केले जाते. यासाठी आतापासूनच स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बाजारात व्यापाऱ्यांची दुकान स्वच्छतेसाठी लगबग पाहावयास मिळत आहे.

झेंडूची आवक

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात झेंडूंच्या फुलांची आवक वाढू लागली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात झेंडू खरेदी केले जातात. त्यामुळे आतापासूनच बाजारात झेंडूंची आवक दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.