25 किलोचा मोडुसा मासा पाहण्यास गर्दी
रत्नागिरीमधून कोल्हापूर फिश मार्केटमध्ये आवक : प्रचंड मागणी अर्ध्यातासात मासा फस्त
कोल्हापूर प्रतिनिधी
रत्नागिरी येथून कोल्हापूर फिश मार्केटमधील घोटणे फिश सेंटरमध्ये रविवारी मोडुसा जातीच्या 25 किलो वजनाच्या माशाची आवक झाली. मासा खरेदीसाठी फिश मार्केटमध्ये आलेल्या नागरिकांनी हा मासा पाहण्यासाठी मासे विक्रेते उमेश घोटणे यांच्या फिश सेंटरमध्ये गर्दी केली होती. माशाला प्रचंड मागणी असल्याने विक्रीस सुरुवात केल्यानंतर केवळ अर्ध्या तासामध्ये संपूर्ण माशाची विक्री झाल्याचे घोटणे यांनी सांगितले. सहाशे रुपये प्रतिकिलो दराने माशाची विक्री झाली.
कोल्हापूर फिश मार्केटमध्ये रत्नागिरी, सिंधूदूर्ग जिल्ह्यातून माशांची आवक होते. पापलेट, सुरमई, बांगडा, रावस, कोळंबी अशा विविध प्रजातींच्या माशांची येथे दैनंदिन आवक होते. मात्र रविवारी येथील घोटणे फिश सेंटरमध्ये मोडुसा जातीच्या 25 किलोच्या माशाची आवक झाली. सेंटरमध्ये हा मासा ठेवला असता या मोठा मासा पाहण्यासाठी मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी घोटणे यांच्या सेंटरसमोर गर्दी केली होती. समुद्राच्या खोल पाण्यामध्ये हा मासा आढळून येतो. या माशाची आवक फार कमी प्रमाणात होते. सुमारे पाच ते सहा महिन्यांनी या माशाची रविवारी आवक झाली. या माशामध्ये कॅल्शियम व प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. माशामध्ये काटा नसल्याने फिंगर चिप्स बनविण्यासाठीही या माशाचा वापर केला जातो.