साळावली धरणावर पर्यटकांची झुंबड
रविवारी दिवसभरात अंदाजे 4 हजार पर्यटकांची भेट, भरून वाहणाऱ्या जलाशयाची भुरळ
सांगे : निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार घडविणाऱ्या साळावली धरणाचा परिसर पाहण्यासाठी आणि वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी रविवारी देशी पर्यटकांनी एकच गर्दी केली. वास्तविक धरणाचा जलाशय ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहू लागले की, पर्यटकाची पावले आपोआपच साळावली धरणाकडे वळतात. पावसाळ्यातील हे मनोहारी दृष्य पाहण्यासाठी सुमारे अडीच हजारांहून जास्त पर्यटकांनी रविवारी दुपारी 2 पर्यंत धरणाला भेट दिली होती. सध्या कोसळत असलेला धो धो पावसात धरणाचा जलाशय पूर्ण भरून वाहू लागला आहे. हे मनोहारी दृष्य अंगावर शहारे आणते. गोव्यातील हे सर्वांत मोठे धरण असून पावसाळ्यात येथे भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. रविवारी धरणाच्या जलाशयातील पाणी पातळी 42.42 मीटर इतकी झाली होती. धरणावर भेट दिलेल्या पर्यटकापैकी सुमारे 70 टक्के पर्यटक हे गोव्याबाहेरील होते. रविवारी दिवसभरात सुमारे चार हजार पर्यटकांनी भेटी दिल्याचा अंदाज आहे.
या धरणाला भिडून काही अंतरावर असलेल्या आणि मूळ कुर्डी येथून जशास तशा स्थलांतरित केलेल्या शेळपे येथील श्री महादेवाच्या मंदिरालाही पर्यटक आवर्जुन भेटी देतात. सालावली धरणाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. कुडचडे येथून आल्यावर दांडो येथून शेळपेमार्गे अंतर 7 किलोमीटर आहे. याशिवाय सांगे, पाजीमळ येथूनही धरणाकडे जाता येते. हे अंतर सुमारे 1.5 किलोमीटर इतके आहे. या ठिकाणी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले असून दोन्ही बाजूंनी प्रवेश घेतेवेळी पर्यटकांचे ओळखपत्र तपासले जाते तसेच धरणावर खासगी वाहने नेण्यास बंदी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने पार्क करून चालत जावे लागते. धरण परिसरात गोवा मानव संसाधन विकास महामंडळाकडून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथे प्रवेश फी प्रौढांसाठी प्रत्येकी रु. 60, तर लहान मुलांसाठी प्रत्येकी रु. 30 आकारली जाते. सकाळी 9 ते संध्या. 6.30 पर्यंत प्रवेश दिला जातो.