गर्दी... पर्यटकांची अन् वाहनांची!
विविध रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी : सर्वच भागांतील पोलिसांची दमछाक : वाहनांसह बस, विमान तिकीटात वाढ
विशेष प्रतिनिधी/ पणजी
एका बाजूने पर्यटक येत नाहीत म्हणून काहीजण ओरड करत असताना गेले आठ दिवस गोव्यात पर्यटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. गोव्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पणजी, म्हापसा तसेच उत्तर गोव्यातील किनारी भागातील रस्ते मोठ्या प्रमाणातील वाहने आणि पर्यटकांनी भरलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक पोलिस यंत्रणेवर ताण आलेला आहे. गोव्यात आज नूतन वर्ष साजरे करण्यासाठी गेल्या दोन दिवसांत पर्यटकांची एवढी गर्दी वाढलेली आहे की पोलिसांच्या हातून नियंत्रणही जाऊ लागलेय. तेलंगण, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मिळेल त्या वाहनातून पर्यटक गोव्यात पोहोचले आहेत. त्यामुळे रविवारी म्हापसा, पणजी, कळंगुट, कांदोळी, सिकेरी आदी भागातील रस्ते वाहनांनी भरून गेले.
हॉटेलांच्या दरात प्रचंड वाढ
बहुतांश समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी उसळली आहे. पर्यटकांसाठी असलेल्या हॉटेलांचे दर दुप्पट, तिप्पटीने वाढलेले आहेत. पर्यटकांना रहायला हॉटेलच्या खोल्या अपुऱ्या पडल्या असल्याने मिळेल त्या ठिकाणी आसरा घेणे पर्यटकांना भाग पडले आहे.
बस, विमान तिकिट महागले
गोव्यात येणाऱ्या विमानांच्या तिकीट दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. 5 जानेवारीपर्यंत गोव्यातून विविध ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या विमानांच्या तिकीट दरात भरमसाठी वाढ दाखविण्यात आली आहे. पुणे, मुंबई, बंगळूर, मंगळूर या ठिकाणाहून गोव्यात येणाऱ्या खासगी बस चालकांनीदेखील तिकीट दरांमध्ये दुप्पटीने वाढ केली आहे. गोव्यात येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत.
वाहतूक व्यवस्था कोलमडली
राजधानी पणजी शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडलेली आहे. तेलंगण, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून कार, जीप्स व तत्सम वाहने घेऊन पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात पोहोचलेले आहेत. पर्यटकांनी वाट्टेल त्या ठिकाणी वाट्टेल तशी वाहने पार्क केलेली आहेत. पर्यटकांवर कारवाई करू नका, असा आदेश आल्याने वाहतूक पोलिसही पर्यटकांना मोकळे सोडत आहेत.
रविवारी दाबोळीत 80 विमाने
दाबोळी विमानतळावर वाहतूक वर्दळ प्रचंड वाढली आहे. रविवारी एकाच दिवशी तेथे 80 विमाने उतरली. रविवारी एकाच दिवशी 30 हजार पर्यटक गोव्यात आले. अनेक विदेशी पर्यटक खास चार्टर विमानाने गोव्यात पोहोचले आहेत. सोमवारी 70 विमाने दाबोळीत पोहोचली. त्याचबरोबर 25 हजार पर्यटक गोव्यात आले.
नवर्षाच्यानिमित्ताने आज सर्वत्र धुमाकूळ
आज 31 डिसेंबर हा यावर्षाचा अखेरचा दिवस. यानिमित्ताने गोव्यात नूतन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने असंख्य प्रमाणात डान्स पार्ट्या, संगीत पार्ट्या तसेच अनेक विविध कार्यक्रमांचे संपूर्ण गोवाभर आयोजन केले आहे. याशिवाय ख्रिस्ती धर्मियांनी रात्री 11 वाजल्यापासून चर्चमध्ये प्रार्थना सभा आयोजित केलेल्या आहेत. आज गोव्यात सर्वत्र नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त धुमाकूळ असून अनेक दारुचे बार रात्री उशिरापर्यंत खुले रहातील. तसेच बहुतांश हॉटेलांमध्ये देखील विशेष पार्ट्यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
अनेक मंत्री, न्यायाधीश, व्हीआयपी दाखल
मावळत्या वर्षला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2025 चे स्वागत करण्याकरीता अनेक केंद्रीय मंत्री, व्हिआयपी तसेच न्यायाधीश गोव्यात दाखल झाले असून आणखी अनेकजण गोव्याच्या वाटेवर असल्याची माहिती प्राप्त झाले आहे. सिने कलाकार, क्रीकेट, राजकर्ते व इतर महनीय व्यक्तीसाठी गोवा हे प्रमुखपर्यटन स्थळ असून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी त्यांची पावले गोव्याकडे वळताना दिसत आहेत. केंद्रीय उद्योग व वाणिज्यमंत्री पियुष गोयल, केंद्रीय अवजड वाहनमंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजपचे कर्नाटकातील खासदार बसवराज बोम्मई गोव्यात पोहोचले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधेश विभू बाव्रू, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मनमोहन हे गोव्यात दाखल झाले आहेत. अनेक व्हिआयपी गोव्यात दाखल झाले असून त्यांनी आपली भेट गुप्त राखली आहे..