दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
लांबपल्ल्यासह स्थानिक मार्गावरही अधिक बसेसची सोय
बेळगाव : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असते. सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात. यामुळे विविध भागात असणारे लोक सणानिमित्त आपापल्या गावी येत असतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन खात्याकडून विविध मार्गांवर विशेष बस सुविधा पुरविण्यात आली आहे. सोमवारीही नागरिकांनी आपापल्या गावी जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानकातून लांबपल्ल्यासह स्थानिक मार्गावरही अधिक बसेस सोडल्या आहेत.
नागरिक सणाला आपापल्या गावी परतण्यासाठी लगबग करत आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबिज असल्याने नागरिकांची ये-जा सुरू असते. यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या आहेत. बेळगावमधून महाराष्ट्र व गोव्याकडे जाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे बसस्थानकातून लांबपल्ल्याच्या विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांची बसविना गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.