मिरजकर तिकटी ते ताराबाई रोडवरच सायंकाळी मंडळांची गर्दी! गर्दीमुळे महिला,लहान मुलांचे हाल
कोल्हापूर प्रतिनिधी
मंगळवारी गणेश विसर्जन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. पण दुपारपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ताराबाई रोडच्या पुढे मिरवणूक सरकत नव्हती. यामुळे या वेळेत मिरजकर तिकटीपासून ते ताराबाई रोडपर्यंत प्रचंग गर्दी झाली होती. यामुळे धक्काबुक्कीच्या घटनाही घडल्या. ताराबाई रोड ते पापाची तिकटी पर्यंतचा रस्ता रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण रिकामा होता.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक सोहळयात शहर आणि उपनगरातीलही गणेश मंडळे सहभागी होतात. मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या या मंडळांची संख्या शेकडो आहे. प्रशासनाने मुख्य मिरवणूक मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत. त्याप्रमाणे बहुतांश मंडळे पर्यायी मार्गाचा अवलंब करतात. मात्र शहरातील काही ठराविक मंडळांचा मुख्य मिरवणूक मार्गासह ठराविक वेळेत ठराविक पॉईंटला येण्यासाठी अटाहास असतो. या मंडळांना रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत महाद्वार रोड ते पापाची तिकटी याठिकाणी आपली मिरवणूक असावी असे वाटते.यामुळे अशी मंडळे मिरवणूक मार्गावर आली तरी महाद्वार रोडवर येण्यासाठी पुढे न सरकता रेंगाळत राहतात. ही मंडळे पुढे जात नसल्यामुळे त्यांच्या मागे असलेल्या मंडळांना आपली मिरवणूक पुढे घेऊन जाता येत नाही. यामुळे मागे मिरवणूकींची रांग वाढत जावून गर्दी होते.
मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात मिरवणूकांना प्रारंभ झाला. दुपारपर्यंत बहुतांश मंडळे मिरजकर तिकटीपर्यंत आली होती. उमा टॉकीज, बिंदू चौक, संभाजीगर मार्गे आलेल्या मिरवणूका याठिकाणी थांबल्या होत्या. सायंकाळी सहानंतर शहरातील मोठया मंडळांच्या मिरवणूका मार्गावर आल्या. यामुळे गर्दी वाढली होती. बिनखांबी गणेश मंदिर येथील मिक्सिंग पाँईंटलाही शिवाजी पेठ परिसरातील मिरवणूका येऊन थांबल्या होत्या.पुढे ताराबाई रोडपर्यंत मंडळांच्या मिरवणूकांची रांग होती. पण रात्रीचे आठ वाजले तरी ताराबाई रोडच्या पुढे एकही मंडळ सरकत नव्हते. यामुळे मागे ताराबाई रोड ते मिरजकर तिकटी पर्यंत गर्दी झाली होती. एकाच ठिकाणी मंडळे उशिरापर्यंत रेंगाळल्याने गर्दीत वाढ होऊन या गर्दीतून मार्ग काढताना नागरिकांची दमछाक होत होती. महिला आणि लहान मुलांचे यामुळे हाल झाले.
पोलीसांकडून मिरवणूका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न
मिरवणूकीत पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. एकाच ठिकाणी मंडळांनी थांबून गर्दी करु नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून होते. एखादे मंडळ एकाच ठिकाणी रेंगाळल्यास पोलीसांकडून त्या मंडळांना पुढे सरकण्याचे आवाहन करण्यात येत होते. पण सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मिरजकर तिकटी ते ताराबाई रोडवर रेंगाळलेल्या मंडळांना पुढे सरकवण्यासाठी पोलीस फारसे पुढे आले नाहीत.