Sangli News : गुड्डापूरला भक्तांची गर्दी! दानम्मा देवीची कार्तिकी यात्रा उत्साहात!
दानम्मा देवीच्या यात्रेची धूम! कर्नाटक–महाराष्ट्रातून दिंड्यांची रेलचेल
माडग्याळ : जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीची कार्तिकी यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री ब्रह्मांड गुरुजी बेंगळूर व गुड्डापूर येथील हिरेमठ संस्थांनचे श्री ष. भ्र. गुरुपाद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते अन्नदान सोहळा प्रसाद पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी दानम्मा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोबी, ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश गणी, सदाशिव गुडोडगी, गजेंद्र कुल्लोळी, शंभुलिंग ममदापूर, मल्लिकार्जुन पुजारी, धानाप्पा पुजारी सचिव विठ्ठल पुजारी सर्व संचालक मंडळ भाविक भक्तांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्तिक यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात पायी चालत येताना दिसत आहेत. विजापूर, बागलकोट, जमखंडी, बेळगावी व सोलापूर आदि मार्गावरून भाविकांच्या दिंड्या पायी चालत येताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान कमिटीने भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता देवस्थान कमिटीकडून घेण्यात येत आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी धानम्मा देवीचे दर्शन घेतले.
आज बुधवार १९ रोजी मुख्य दिवस आहे. या दिवशी लाखो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जत पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यात्रेच्या विविध मार्गावर देवीच्या भक्ताकडूनही अन्नदासोडची सोय केल्याचे दिसून येत होते.