गणेश मूर्तीच्या स्टॉलवर भक्तांची गर्दी
सातारा :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. साताऱ्यात पेण व कोकणातून विक्रीकरता खास स्वरुपाच्या आलेल्या गणेश मूर्तीबरोबरच वेगवेगळ्या स्वरुपातील फेट्यातले बाप्पा सेल्फी काढतानाचा बाप्पा, गाडी चालवत असतानाचा बाप्पांच्या मूर्ती स्टॉलवर विक्रीकरता आहेत. त्याचबरोबर पारंपारिक पद्धतीच्या मूर्तीही विक्रीला असून यंदा गणेश मूर्तीच्या किमती ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत. मूर्ती बुकींग स्टॉलवर सुरु असून रविवारी अनेक गणेश भक्तांनी आवर्जून हजेरी लावली होती.
सातारा शहरात दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहुल गणेशमूर्तीच्या लागलेल्या स्टॉलवरुन, सुरु असलेल्या मंडप उभारणीच्या कामावरुन दिसून येत आहे. शहरात बाजारपेठात मूर्ती विक्रीचे स्टॉल्स लागलेले असून त्या रटॉल्सवर विविध आकर्षक अशा मूर्ती विक्रीकरता उपलब्ध आहेत. त्यामध्ये खास पेणवरुन आणलेल्या मूर्तीना मोठी मागणी आहे. ज्या मूर्तीची कलाकृती चटकन गणेश भक्तांना आकर्षित करत आहेत. गणेशमूर्तीमध्ये वेगळेपणा, मूर्तीमध्ये भाव, मूर्तीचे रंगकाम हे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर अलिकडच्या स्मार्ट जमान्यात कशा मूर्तीचे मागणी होईल हे सांगता येत नाही. त्या अनुषंगाने मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्तीही स्टॉल्सवर विक्रीला आलेल्या आहेत. त्यामध्ये बाप्पा सेल्फी काढत आहेत. बाप्पा थार गाडी चालवत आहेत, बाप्पा यानातून उतरत आहेत, त्याचबरोबर बाप्पांची विविध रुपेही साकारली गेली आहेत.
- वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती उपलब्ध
यावर्षी २७ ऑगस्टला गणपती येत आहेत. आमच्याकडे बाळगणेश, दगडूशेठ, सिंहासनावरचे गणपती, विविध वाहनांवर आरुढ झालेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १० इंचापासून अडीच ते तीन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती आपल्याकडे आहेत.
-श्रीकांत आंबेकर गणेशमूर्ती विक्रेते