निरवडे देव भूतनाथच्या जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी
न्हावेली /वार्ताहर
निरवडे येथील ग्रामदैवत श्री देव भूतनाथ देवस्थानच्या वार्षिक उत्सवानिमित्त गुरुवारी हजारो भाविक भूतनाथ चरणी नतमस्तक झाले.श्री देव भूतनाथच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती.यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमानंतर भूतनाथ पंचायतनातील देवतांना भरजरी वस्रांसह सुवर्णालंकारानी सजविण्यात आले.देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालून देवाची मानाची ओटी भरण्यात आली.त्यानंतर देवाच्या दर्शनास प्रारंभ झाला.यानंतर आशिर्वादासह ओटी भरणे केळी ठेवणे नवस बोलणे फेडणे यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.ओटी भरण्यासाठी माहेरवाशीणींसह महिलांची रिघ लागली होती.तसेच या उत्सवानिमित्त भूतनाथचे मंदिर भाविकांनी फुलून गेले होते.तर मंदिराचा परिसर विविध प्रकारच्या दुकानांनी गजबजून गेला होता.भूतनाथ मंदिराचा सभामंडप आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.रात्री भाविकांच्या गर्दीत फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य पालखी सोहळा झाल्यानंतर रात्री उशिरा कलेश्वर भाई कलिंगण यांचा नाट्यप्रयोग झाला.या जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना देवाचे दर्शन वेळेत होण्यासाठी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी सर्व मानकरी व ग्रामस्थांनी नियोजन केले होते.