पणजी बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी
वाहने पार्किंगसाठी अडचण, वाहतुकीची कोंडी
प्रतिनिधी/ पणजी
पणजी राजधानीत स्मार्ट सिटीचे काम सुऊ केले असल्याने ठिकठिकाणी रस्ते खणलेले आहेत. त्यामुळे अगोदरच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यात दिवाळी सणानिमित्त काल शनिवारी खरेदीनिमित्त पणजी मुख्य बाजारामध्ये ग्राहकांची तुडुंब गर्दी दिसत होती. बाजारात रोजच्यापेक्षा जास्त वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. बाजारात आलेल्या लोकांना त्यांची वाहने पार्क करण्यासाठी जागाच मिळत नव्हती. नियोजनाच्या अभावामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावे लागले.
जी गोष्ट वाहन पार्किंगच्याबाबत होत होती, तीच स्थिती बाजारात खरेदी करताना ग्राहकांना अनुभवायला मिळत होती. छोटे आकाशकंदील विकणारे विक्रेते पाहिजे त्या ठिकाणी बसतात, अनेक दुकानदारांनी दुकानाच्या बाहेरील जागा सामान लावण्यासाठी अडविल्याने ग्राहकांना चालायलाही मिळत नव्हते. याच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत होते. एका बाजूने वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नव्हती, अशी ग्राहकांची परिस्थिती होती.
दिवाळीसाठी लागणारी मिठाई, दिवे, आकाशकंदील तसेच अन्य विविध साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पणजी मुख्य मार्केट प्रमाणे राज्यातील सर्व महत्त्वाच्या मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी होती. जन्माष्टमी, फेस्त यासारख्या फेरी बाजाराच्या बाहेर वेगळ्या ठिकाणी भरविल्या जातात त्याचप्रमाणे दिवाळीची फेरी वेगळ्या ठिकाणी भरली असती तर बाजारात होणारी गर्दी कमी झाली असती. तसे न झाल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आणखी अवघ्या काही दिवसांनी तुळशीच्या लग्नासाठी लागणाऱ्या सामानाची फेरी भरणार आहे. त्यालाच जोडून अगोदर दिवाळीची फेरी भरली असती तर होऊ शकले असते, असे काही ग्राहकांनी सांगितले
काल पणजीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केल्याने पणजी शहरात मार्केटमध्ये वाहतूक कोंडी झाली. दिवसभर लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. पणजी मार्केटमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र त्यांचीही तारांबळ उडाली होती. पणजी मुख्य बाजारामध्ये एरव्ही वाहने पार्क करण्यासाठी जागेची कमतरता असते. त्यामुळे लोकांना आता चारचाकी वाहने दूर पार्क कऊन बाजारात यावे लागले. लोकांनी तर आपली वाहने दूरवर जागा मिळेल तिथे पार्क कऊन बाजारामध्ये साहित्य खरेदी केले.