Satara News : म्हसवडमध्ये यात्रा पटांगणावर व्यावसायिकांची लगबग
म्हसवड रथोत्सवासाठी यात्रा पटांगण गजबजले
म्हसवड : श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव शुक्रवारी १ वाजता गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हसवड येथील यात्रा पटांगणात पालिकेच्या बतीने तात्पुरत्या स्वरुपात जागा देण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. मनोरंजनाची खेळणी, तमाशा, फिरते सिनेमागृह, खाद्यपदार्थाच्या दुकानाची रेलचेल, कटलरी, बांगड्या, लहान मुलांची खेळणी, हळदी-कुंकू, हॉटेल, चायनीज, कंदी पेढे, मेवा मिठाई आदी व्यावसायिकांची दुकाने, खेळणी लावण्याची गडबड सध्या यात्रा पटांगणात सुरू आहे. तर पोलीस यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, विज वितरण, बांधकाम विभाग, आपआपली कामे करण्याची लगबग सुरू आहे.
म्हसवडकरांचे व परिसरातील दैवत व पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव आज शुक्रबार दि. २१ रोजी होणार असल्याने. यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विविध व्यावसायिकांची दुकाने, मनोरंजन खेळ, पाळणे उभे करण्याची गडबड सुरू असून माणगंगा नदीलगत असलेल्या यात्रा पटांगणावर दरवर्षी यात्रा भरते. त्यामुळे खेळण्यासाठी विविध स्टॉलची गर्दी झाली आहे. सर्व विभागाच्या वतीने आपापली कामे रथोत्सवाच्या आधी पूर्ण करण्याची गडबड सुरू आहे.
पालिकेच्या वतीने यात्रा पटांगणा व शहरात स्वच्छता आरोग्य पाणी जागा वाटप गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. यात्रेपूर्वी सर्व कामे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासक डॉ. सचिन माने सांगितले तर सपोनि अक्षय सोनवणे म्हणाले, पार्किंग, शहरात वाहने येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल मंदिर व यात्रा पटांगणावर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यात्रा पटांगणा याठिकाणी दोन उंच टॅबर उभारले असून यावरुन पुर्ण यात्रेवर देखरेख करता येणार आहे.
प्राथमिक आरोग्य विभागाने तात्पुरत्या स्वरूपात म्हसवड नगरपालिकेसमोर, बसस्थानक, यात्रा पटांगणावर दवाखाने उभे केले आहेत. आम्ही म्हसवडकर ग्रुपतर्फे यात्रेकरूंसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा या ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आली आहे.