For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागपंचमीच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी

10:51 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागपंचमीच्या पूर्वसंध्येला बाजारात गर्दी
Advertisement

पावसाने उसंत घेतल्याने बाजार बहरला : नागपंचमीसाठी फराळाच्या साहित्याची खरेदी

Advertisement

बेळगाव : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. विशेषत: पोहे, फुटाणे, लाह्या, गूळ यासह नागमूर्तींना मागणी अधिक होती. त्याचबरोबर श्रावणालाही प्रारंभ झाल्याने पूजेच्या साहित्याबरोबर फळफळावळे यांनाही पसंती मिळाली. गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने सकाळपासूनच बाजारात नागरिकांची वर्दळ पाहावयास मिळाली. बाजारपेठेतील नरगुंदकर भावे चौक, कांदा मार्केट, रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी नागरिकांची ये-जा वाढली होती. विशेषत: रविवार पेठ आणि कांदा मार्केट येथील चुरमुरे-फुटाण्यांच्या दुकानात खरेदी वाढली होती. त्याबरोबरच उपवासाच्या पदार्थांची खरेदी झाली. त्यामध्ये साबूचिवडा, वरी आणि फळांचा समावेश होता. नागपंचमीच्या सणासाठी फराळ केला जातो. त्यामुळे फराळाचा चिवडा, तयार लाडू, चकली व इतर पदार्थांना अधिक मागणी होती. यंदा फराळाचे दर वाढले आहेत. गुरुवारी नागपंचमीच्या पूर्वसंध्येला बाजारात नागरिकांची गर्दी झाली होती.

आज नागमूर्तींचे पूजन

Advertisement

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पूजेच्या साहित्याबरोबरच पाच फळांची मोठी खरेदी झाली. श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्याने पूजेचे साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. त्याबरोबरच शुक्रवारी नागमूर्तींचे पूजन केले जाणार आहे. यासाठी गुरुवारी बाजारात रंगीबेरंगी नागमूर्ती खरेदी करण्यात आल्या.

शहरासह ग्रामीण भागात आज नागपंचमी

शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. विशेषत: नागमूर्ती आणि वारुळाची पूजा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पूजेच्या विविध साहित्याची खरेदी झाली आहे. त्याबरोबरच नागदेवतेची पूजा करून लाह्या आणि इतर नैवेद्य दाखविला जाणार आहे. काही नागरिकांनी गुरुवारीच नागमूर्ती आणल्या आहेत. काही जण शुक्रवारी नागमूर्ती आणून पूजन करणार आहेत. शुक्रवारी नागोबाच्या मंदिरांतूनही दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढणार आहे. उंदरांचा नाश करणाऱ्या सापाप्रती ग्रामीण भागात शिवारात जाऊन नैवेद्य दाखवून पूजा केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.