लष्करी वर्दीसाठी बेळगावात गर्दी
बेळगाव : प्रादेशिक सेनेच्यावतीने (टेरीटोरियल आर्मी) बेळगावमध्ये लष्कर भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवार दि. 23 रोजी बेळगावसह 9 जिल्ह्यांतील उमेदवारांना भरतीमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय मिलिटरी मैदानावर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. शनिवारी रात्रीच परजिल्ह्यातील उमेदवार शहरात दाखल झाले. रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, सीपीएड मैदान व शरकत मैदानावर उमेदवारांची गर्दी दिसून आली. रविवारी बेळगाव जिल्ह्यासह उडुपी, दावणगिरी, शिमोगा, रायचूर, गदग, हावेरी, विजापूर, यादगीर व विजयनगर या जिल्ह्यातील उमेदवारांना संधी देण्यात आली. 15 नोव्हेंबरपासून कँप येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या समोरील मैदानावर प्रादेशिक सेनेच्यावतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, केरळ, तामिळनाडू त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना संधी देण्यात आली. शुक्रवारी कर्नाटकातील उमेदवारांना संधी देण्यात आली. या भरतीसाठी वेगवेगळ्या भागातून इच्छुक भावी सैनिक भरतीसाठी दाखल झाले आहेत. एकंदरीत वर्दीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.