विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी
फुले, फळे, पूजेच्या साहित्यासह वाहने-इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भर
बेळगाव : विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहरासह उपनगरांमध्ये खरेदीसाठीचा उत्साह दिसून आला. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यासह फुले, फळे, सोने-चांदी यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. त्याचबरोबर दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसह बुकिंग करण्याकडे ग्राहकांचा कल होता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी दिवशी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. या दिवशी नवीन वस्तू, उपकरणे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. यावर्षी केंद्र सरकारकडून दुचाकी, चारचाकी वाहनांवरील जीएसटी कमी करण्यात आल्याने वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल अधिक आहे.
आपल्याला हव्या असलेला रंग आणि मॉडेलमध्ये वाहन मिळावे, यासाठी यापूर्वीच बुकिंग करण्यात आले आहे. बुधवारी अनेकांनी आपल्या बुकिंगप्रमाणे वाहने उपलब्ध झाली आहेत का? हे तपासण्यासाठी शोरुम्समध्ये गर्दी केली होती. गुरुवारी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वाहन खरेदी केली जाणार आहे. बुधवारी सकाळपासून काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरेदीसाठी गर्दी दिसून आली. खंडेनवमीसाठी ऊस, पूजेचे साहित्य, केळीची पाने, नारळ यांची खरेदी केली जात होती. काकतीवेस रोड, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ रोड, शाहूनगर रोड या परिसरात ऊसविक्री केली जात होती. शंभर रुपयांना पाच ऊस या दराने उसांची विक्री सुरू होती.
झेंडूच्या दरात वाढ
विजयादशमीला फुलांची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे अशोकनगर येथील होलसेल फूलमार्केटमध्ये पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. पिवळा व केशरी झेंडू, शेवंती, गलाटा, लहान गुलाब यासह इतर फुले मोठ्या प्रमाणात दाखल झाली होती. एरवी 20 ते 30 रुपये किलो दराने होलसेल फूलबाजारात विक्री केला जात असलेला झेंडू बुधवारी मात्र 80 ते 100 रुपये किलो दराने विक्री केला जात होता. त्याचबरोबर 100 ते 150 रुपये किलो दराने पांढऱ्या शेवंतीची विक्री होत होती. बुधवारी दिवसभरात फूलमार्केटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले.