बनावट हक्कपत्रांतून कोट्यावधींचा गंडा
अथणी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा प्रताप : गायरान जमीन केली शेकडो कुटुंबीयांच्या नावावर
अथणी : येथील नगरपालिकेकडून गायरान जमिनीतील भूखंड देण्याचे आश्वासन देऊन जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांच्या हस्तलिखित प्रती देण्यासाठी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी लोकांकडून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रताप नुकताच समोर आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या कुटुंबीयांच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्याचे समजते.
शहरापासून बाहेर असलेल्या एका भागात अनेक कुटुंबांची आश्रय योजनेतील घरे आहेत. तेथे काही भाडोत्री कुटुंबेही वास्तव्यास आहेत. पालिकेच्या हद्दीतील ही जमीन असून ती गायरान आहे. या वसाहतीत बेकायदेशीरपणे जमीन संपादित केली आहे. काही कुटुंबांना ही जागा आपल्या नावे करून देण्याचे आमिष दाखवून पालिकेतील एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने लोकांना गळ घातली. सदर जागेचे उतारे आपल्या नावे करून नंतर डिजिटल उतारे देण्याची ग्वाही दिली होती.
पालिकेतील कर्मचारी असल्याने लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात रक्कम सदर व्यक्तीला दिली आहे. शेकडो कुटुंबे राहत असल्याने त्यापैकी अनेकांना मालकी हक्कपत्रे दिली आहेत.अनेक लाभार्थ्यांकडे मालकी हक्क कागदपत्रे नाहीत, म्हणून ते मालकी हक्कासाठी अनेकदा पालिकेत येत होते. या संधीचा फायदा घेत पालिकेतील एका कर्मचाऱ्याने मित्राच्या साहाय्याने अशा लोकांकडून पैसे घेऊन काही लोकांना हाताने लिहिलेले उतारे दिले आहेत. यामधून अनेकांकडून मोठी रक्कमही घेतली असून सुमारे 4 कोटी रुपये लाच स्वरूपात घेतल्याचा आरोप शहरातील वकील संपतकुमार शेट्टी यांनी केला आहे. 50 हजार ते 5 लाखांपर्यंत रक्कम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पैसे देणाऱ्या लाभार्थ्यांनी डिजिटल प्रत मागण्यास प्रारंभ करताच गेल्या 6 महिन्यांपासून बहाणे करून वेळकाढूपणा सुरू केला आहे. याबाबत नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सरकारच्या आदेशाशिवाय अशाप्रकारे भूखंड देता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात लोकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. संबंधित पालिकेतील कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याच्याकडून फसवणूक झालेले पैसे परत करावेत, असे निवेदन पालिकेला नागरिकांनी दिले आहे.