पिके पाण्याखाली, शेतकरी चिंताग्रस्त
बोरगाव / सागर वाझे :
गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेली आहे. अनेक ठिकाणी नदीतील पाणी पात्राबाहेर गेले आहे. त्यामुळे नदीकाठच्या खरीप हंगामातील पिकाबरोबर ऊस, केळी अशी नगदी पिके पाण्याखाली गेली आहेत. २०१९ च्या महापुरातून सावरलेला शेतकरी पुन्हा एकदा उध्वस्त होण्याची वेळ या पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे.
चार दिवसापासून संततधार पडणारा पाऊस आणि कोयना धरणातून सोडलेला विसर्ग यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी दिवसागणीक वाढत आहे. शेतात साठून राहिलेल्या पाण्यामुळे या खरीप हंगामातील भात, सोयाबीन, आडसाली ऊस लागण यासारख्या पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा चालू वर्षीचा खरीप हंगाम हातचा जाणार आहे. एकूणच शेतीकार्याचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. महापुराच्या पाण्यामुळे शेतातील मातीची नापिकतेचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्नात घटच आहे.
याचा फटका सधन शेतकऱ्या बरोबर अल्पभूधारक शेतकऱ्यांला बसत आहे. नदीकाठचा शेतकरी १०० टक्के उध्वस्त होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चालू हंगाम पुन्हा या नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडतोय की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या शेतीचे शासनाकडून तात्काळ पंचनामे करून शासनाकडून त्यांना आर्थिक मदत केली, तरच उध्वस्त होणारा शेतकरी आणि शेती भविष्यात वाचू शकेल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
- गणेशोत्सवावर पुराचे सावट
अवघ्या आठवडयावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, त्यातच नदी काठाच्या गावावर निर्माण झालेली पूर परिस्थिती यामुळे अनेक ठिकाणी या गणेशोत्सवाच्या आनंदावर पुराचे सावट आहे. यामुळे अनेक मंडळांनी देखील पूर परस्थितीमुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने व पारंपारिक पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.