पीक सर्वेक्षकांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात सुमारे 9 ते 10 वर्षांपासून हजारो कर्मचारी पीक सर्वेक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. सर्व्हेचे काम करीत असताना कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. साप व प्राण्यांचे हल्ले तसेच शेतकऱ्यांच्या शिवीगाळालाही सामोरे जावे लागते. एवढे सहन करून काम करीत असतानाही कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देण्यात येत नाही. राज्य सरकारने पीक सर्वेक्षक कर्मचाऱ्यांचा डी ग्रुपमध्ये समावेश करून कायमस्वरूपी रूजू करण्याची मागणी राज्य पीक सर्वेक्षक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात आले तरी याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना पीक विम्याचे डिजिटल ओळखपत्र द्यावे. विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात येते असे न करता त्यांना नोटिसा पाठवून व संपूर्ण घटनेची माहिती घेऊनच त्यांच्यावर कारवाई करावी. कर्मचारी सेवा बजावत असताना तनमनधनाने काम करीत असतात. मात्र त्यांच्यावर अन्याय होत आहे. यासाठी सदर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून त्यांना योग्य मानधन देण्याची मागणीही करण्यात आली.