30 ऑक्टोबरपर्यंत पीक नुकसान भरपाई
बेंगळूर : बिदरसह उत्तर कर्नाटकात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीकहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एनडीआरएफच्या मार्गसूचीनुसार मिळणाऱ्या रकमेसोबत एकरी अतिरिक्त 8,500 रुपये भरपाई देण्याची घोषणा केली होती. पीक नुकसान भरपाईसाठी एकूण 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 30 आक्टोबरपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती वनमंत्री आणि बिदर जिल्हा पालकमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली. बुधवारी बिदर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केडीपी बैठकीत त्यांनी पीकनुकसानी संदर्भात संबंधित तहसीलदारांना गुरुवार सायंकाळपर्यंत पोर्टलवर माहिती अपलोड करावी. भरपाई वितरणासाठी तातडीने कार्यवाही करावी,अशी सूचना दिली.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ नियमांनुसार 170 कोटी रुपये भरपाई दिली जात आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत 300 कोटी भरपाई देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पावसामुळे घरांची पडझड, जनावरे दगावली असेल तर संबंधितांना भरपाई देण्यासाठी अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी धाव घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली. पावसामुळे झालेल्या हानीचा तपशिल माहिती पोर्टलमध्ये नोंदवावी. पोर्टलवर नमूद करण्यात आलेली माहिती ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय आणि रयत संपर्क केंद्रांमध्ये प्रदर्शित करावी. त्यावर हरकती मागवाव्यात. यामुळे कोणत्याही नुकसानग्रस्ताची माहिती पोर्टलवर नमूद करणे राहून गेल्यास त्याचे नाव समाविष्ट करणे सोयीचे होईल, असेही मंत्री ईश्वर खंड्रे यांनी सांगितले.