शिरगाव-मुसळवाडी परिसरात गव्यांकडून पिकांचे नुकसान
वन्यविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त
कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातील शिरगाव-मुसळवाडी परिसरात रात्री 12 वाजल्यापासून पहाटेपर्यंत मुक्तपणे वावरणाऱ्या गव्यांच्या कळपाने लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. गव्यांचा कळप शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहेत.
या परिसरात सुमारे एक महिना कळपांचा वावर आहे. दिवसभर गाव शेजारील जंगलात वास्तव्य करून रात्रभर शेतामध्ये घुसून ऊस मक्का, वरणा आदी पिकांचे अतोनात नुकसान करत आहेत. शिरगाव गावातील जंगल हद्दी शेजारील कुंभारकी, रांग व मुसळवाडी हद्दीतील नाळवा नावाच्या शेतातील पिकांचे खाऊन, तुडवून एक दिवसाआड सतत नुकसान करत आहेत. गव्यांच्या कळपापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी दिवसभर शेती कामे करून रात्रभर पिकांची राखण करावी लागत आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
यापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिक क्षेत्राचे पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाईची आश्वासन दिले आहे. मात्र मशागत, बियाणे, खते, व वाढलेली मजूरी पाहता ही मदत पुरेशी नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच रात्रपाळीत शेतीला पाणी देताना गव्यांच्या हल्ल्याची भिती आहे.
साहेब आम्ही जगायच कस !
गेला महिनाभर शिरगाव, मुसळवाडी, बुरबाळी, परिसरात गव्याच्या कळपाने उच्छाद मांडला आहे. शेतकऱ्यांना प्रमुख आर्थिक आधार असणाऱ्या ऊस पिकाचे होणारे नुकसान पाहून हतबल झाला आहे. एकीकडे शेती उत्पादनाचा वाढता खर्च तर काबाड कष्ट करून पिकविलेल्या पिकांचे होणारे नुकसान अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा व जगायच कस असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.