कापड व्यवहारात व्यापाऱ्याची 89 लाखांची फसवणूक
राजस्थानमधून दोघांना ताब्यात
शिवाजीनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूर
ग्रे कापड व्यवहारामध्ये विश्वास संपादन करुन संगनमताने ८९ लाख १८ हजार ७३४ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रेखा कुशल सुराना (वय ४५), कुशल सुराना (वय ४८) आणि खेतु मुलचंद खांतेड (वय ३२, तिघेही रा. पाली, राज्य - राजस्थान) अशी त्यांची नांवे आहेत. या प्रकरणी विकाश बंशीधर दोसी (वय ४०, रा. भिवंडी, जि. ठाणे) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भिवंडी येथील कापड व्यापारी विकास दोसी यांच्याकडून मे. शंकेश्वर ग्रुप इंडियाच्या रेखा कुशल सुराना व त्यांचे भागीदार कुशल सुराना, मे. गुरु मिश्री मिल्स या फर्मचे कुशल सुराना यांनी खेतु खांतेड या मध्यस्थीमार्फत फिर्यादी यांच्या मे. विरात्रा मिल्स, इचलकरंजी या फर्ममधून १ कोटी १८ लाख ६४ हजार २३५ रुपयांचे ग्रे कापड खरेदी केले. संशयितांनी या कापड खरेदीतील २९ लाख ४५ हाजार ५०१ रुपये फिर्यादी दोसी यांना देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, उर्वरीत ८९ लाख १८ हाजार ७३४ रुपये देण्यात टाळाटाळ सुरू होती. याबाबत फिर्यादी दोसी यांनी सुराना यांच्याकडे विचारणा केली असता आम्ही पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, तुझे पैसे बुडाले असे समज. राजस्थान पोलिस आमच्या खिशात आहे, कोठे तक्रार करायची ते कर, पैसे मागितले तर तुला सोडणार नाही, अशी धमकी तिघांकडून दोसी यांना देण्यात आली. त्यामुळे दोसी यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन अपर पोलिस अधिक्षकांकडे अर्ज सादर करण्यात आला होता. त्यांच्या सुचनेवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी या गुह्यातील कुशल सुराना व खेतु खांतेड यांना राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. राजस्थान कोर्टातून वॉरंट घेऊन पोलीस उपनिरिक्षक श्री. साने, पोलिस कॉन्स्टेबल बरगाले आणि चव्हाण हे राजस्थानवरून संशयितांना घेऊन कोल्हापूरला रवाना झाले आहेत.