कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लँड माफियांच्या पैशाचे राजकारण सावंतवाडीकर खपवून घेणार नाही

01:45 PM Dec 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शहराला माफियांच्या हाती जाऊ देणार नाही ;आमदार दीपक केसरकर यांचा कडाडून हल्ला

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी गांधी चौकात आयोजित केलेल्या प्रचारसभेत लँड माफिया आणि त्यांच्या राजकीय समर्थकांविरुद्ध जोरदार तोफ डागली. गोरगरिबांच्या जमिनी लुटून आणि लाटून मिळालेल्या पैशाचा वापर हे लँडमाफिया निवडणुकीत करत आहेत. मात्र, अशा अपप्रवृत्तींना आणि या भ्रष्ट पैशाला सावंतवाडीकरांच्या घरात मुळीच स्थान नाही. सावंतवाडीची जनता या प्रवृत्तींना थारा देणार नाही, तर या निवडणुकीत त्यांना रोखण्याचे काम करेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना व्यक्त केला.

Advertisement

विकासकामांची जंत्री आणि विरोधकांवर पलटवार

दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सावंतवाडी शहरात केलेल्या विकासकामांच्या जंत्रीने केली. "सावंतवाडी शहर पूर्वी कसे होते आणि आता कसे आहे, हे इथल्या प्रत्येक नागरिकाला चांगलेच माहीत आहे," असे ते म्हणाले. शहराला स्टॉलच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि इंदिरा गांधी व्यापारी संकुल निर्माण केले. सध्या नवीन संकुलाची उभारणी होत असल्यामुळे शहराची एक मोठी समस्या असलेली 'पार्किंगची समस्या' संपूर्णपणे दूर होणार आहे.शहराच्या सौंदर्यीकरणावर बोलताना त्यांनी मोती तलावातील 'म्युझिकल फाउंटन'चा उल्लेख केला, जे केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर बाहेरील पर्यटकांसाठीही मोठे आकर्षण ठरणार आहे. याव्यतिरिक्त, जिमखाना मैदानात ड्रेसिंग रूम्सची निर्मिती आणि ५ कोटी रुपयांचे 'तालुका क्रीडा केंद्र' मंजूर करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
"विकासाच्या गोष्टी बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगू नयेत. शहर विकासाची दूरदृष्टी आणि कामे आम्हीच केली आहेत," असे स्पष्टपणे सांगून त्यांनी विरोधकांवर पलटवार केला. पाळणेकोंड धरणाची उंची वाढवणे, माजगावला धरण बांधणे आणि घारपीतही धरण होत असल्याचा उल्लेख करत, ज्यांना सावंतवाडीची माहिती नाही, ते काय विकास करणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकांच्या जमिनी बळकवणारे लँड माफिया शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची माणसं सभेमध्ये जोरदार भाषणे करतात. मात्र, त्यांच्या उमेदवाराला साधे दोन शब्दही नीट बोलता येत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

"सावंतवाडी माझे घर; माफियांच्या हाती जाऊ देणार नाही"

 आमदार दीपक केसरकर यांनी आपला शहराशी असलेला भावनिक संबंध अधोरेखित केला. "माझ्यावेळीही विरोधकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण शहराने मला निवडून दिले. सावंतवाडी मतदारसंघातून मला जनतेने चौथ्यांदा निवडून दिले आहे आणि मला शहरातून सर्वाधिक 'लीड' (मताधिक्य) असते," असे ते म्हणाले. "हे शहर माझे घर आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे शहर माफियांच्या हाती जाऊ देणार नाही," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही लोक हॉस्पिटल, मोती तलाव आणि रेस्ट हाउस 'आमचंच' म्हणतात. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, "माझ्या वडिलांना राजघराण्याने 'नगरशेठ' असा सन्मान दिला होता. त्यामुळे पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा जपावा." त्यांनी जनतेला आवाहन केले की, काही विशिष्ट व्यक्तींना या शहरात घेऊ नका. त्यांचे कार्यालयदेखील शहराबाहेर आहे, त्यामुळे त्यांना शहराबाहेरच ठेवा. सावंतवाडी शहराची शांतता जपणे महत्त्वाचे आहे. दिवाळी, ख्रिसमस आणि ईदला आम्ही सर्व एकत्र असतो. शांत शहराला बिघडवू पाहणाऱ्या शक्तींना दूर ठेवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी मतदारांना केली.

नेतृत्व संपवण्याचा कट 

केसरकर यांनी स्पष्ट केले की, बाहेरच्या वाड्यात मतं खायला चार-चार उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मतं खाण्यासाठी विरोधी पक्ष उभे केले आहेत. त्यांनी थेट इशारा दिला, "विरोधी पक्षाला दिलेले मत म्हणजे भाजपला दिलेले मत आहे. त्यामुळे अशा उमेदवाराला मत न देता शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवारांनाच मत द्या."
युती तोडल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. युतीसाठी आम्ही आग्रही होतो. पण त्यांनी खासदार नारायण राणेंचेही ऐकले नाही. "विरोधी वातावरण असताना नारायण राणे खासदार म्हणून निवडून आले. आमचा संघर्ष विचारांचा होता, आमच्यात व्यक्तिगत संघर्ष कधीही नव्हता," असे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा त्यांनी लँड माफियांच्या राजकारणावर टीका केली. जमिनी बळकवणारे लँड माफिया शहर ताब्यात घेऊ पाहतात. त्यांची माणसं भाषणं करतात, पण भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला स्वतःला दोन शब्दही नीट बोलता येत नाहीत. "तुम्ही तुमचे प्रश्न त्यांच्याकडे मांडायला गेल्यानंतर त्यांना ते कसे समजणार?" असा सवाल त्यांनी केला. लॅण्ड माफियांचे नातेवाईक त्यांच्या वतीने बोलत आहेत, हे जनतेला चालणार का, असा थेट प्रश्न त्यांनी केला.
हॉस्पिटल, मोती तलाव आणि युवराज्ञीवर थेट टीका
केसरकर यांनी विरोधकांचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, नारायण राणे आणि माझे नेतृत्व त्यांना संपवायचे आहे, केवळ स्वतःचे नेतृत्व उभे करण्यासाठी. "मी त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही," असे त्यांनी नमूद केले.शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले, "मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मी दहावेळा त्यांच्याकडे गेलो. परंतु अटी व शर्ती घालण्यात आल्या शासनाची जागा आम्ही द्यायला तयार होतो. त्यांच्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मंजूर होऊन आणि निधी मिळूनही होऊ शकलेले नाही. जर त्यांनी सह्या दिल्या नाहीत, तर आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथेच आमच्या हक्काच्या जागेवर हॉस्पिटल बांधू."सावंतवाडीचे आकर्षण असलेला  मोती तलाव त्या नगराध्यक्ष झाल्यास नगरपरिषदेचा राहणार नाही. मोती  तलावाबाबत केस आहे, "यांच्या घरची सून विरोधात जाणार का? त्यामुळे युवराज्ञी आहे म्हणून नगराध्यक्ष हे चालणार नाही. आधी केस मागे घ्या, मग लोकांकडे मत मागा."
शेवटी, "सावंतवाडीची जनता पैशांना विकली जाणार नाही," असा ठाम विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, शांतता, विकास आणि प्रामाणिक नेतृत्वासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यावे आणि शहराला माफियांच्या तावडीतून वाचवावे.

Advertisement
Tags :
#Tarun Bharat sindhudurg # deepak kesarkar # criticism # bjp # shivsena #
Next Article