तडफडणाऱ्या माशांचे सॅलड
कोणताही मासा पाण्याबाहेर काढला की तडफडतो आणि काही वेळातच प्राणाला मुकतो, हे प्रत्येकाला माहीत आहे. मासे हा अनेकांच्या आहाराचा भाग असतो. त्यामुळे जगाच्या विविध भागांमध्ये माशांचे भिन्न भिन्न पदार्थ लोकप्रिय आहेत. तथापि, मासे पाण्याबाहेर काढून ते तडफडत असतानाच त्यांच्यावर मीठ आणि तिखट घालून त्यांचे सॅलड बनवून खाणाऱ्यांचा एक देश या पृथ्वीतलावर आहे, अशी माहिती कोणी दिली तर त्यावर आपला विश्वास बसणार नाही.
या देशाचे नाव थायलंड असे आहे. तो भारताच्या जवळ असणारा देश आहे. येथील लोक चित्रविचित्र पदार्थ बनविण्याच्या आणि खाण्याच्या बाबतीत चीनलाही मागे टाकतील असे आहेत. जे प्राणी खाण्याची आपण कल्पनाही करु शकत नाही, असे प्राणी किंवा सजीव चीनमध्ये सर्रास खाल्ले जातात. थायलंडही काही प्रमाणात या संदर्भात चीनसारखाच आहे. येथे छोट्या आकाराचे मासे मिळतात ते कच्चे खाल्ले जातात. अशा माशांचे उत्पादन घरात असणाऱ्या पाण्याच्या टाकीत केले जाते. ते मासे टाकीबाहेर काढून त्यांचा जीव जाण्याआधीच ते भांड्यात घालून त्यांच्यावर मीठ आणि मिर्ची पूड तसेच इतर मसाला टाकला जातो. त्यांची कोशिंबीर किंवा सॅलड बनविले जाते आणि ते जेवणाबरोबर चवीने खाल्ले जाते.
तथापि, असे जिवंत माशांचे सॅलड बनविले जात असताना पाहणे, हा अंगावर काटा उभा करणारा प्रकार असतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. कित्येकजण याला क्रूरपणा मानतात. मासे खायचेच आहेत, तर प्रथम त्यांना पूर्ण गतप्राण तरी होऊ द्यावे. ते जिवंत असतानाच त्यांच्यावर मीठ, मिर्चीपूड टाकून त्यांच्या यातना वाढविण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्नही अनेकजण विचारतात. तथापि, थायलंडच्या काही भागांमध्ये अशा प्रकारे जिवंत माशांची कोशिंबीर बनवून ती खाणे हा खाद्य परंपरेचा भाग आहे. त्यामुळे ही पाककृती अशीच केली जाते.