महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संकट हरले, प्रयत्न जिंकले

06:37 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मृत्यूच्या दाढेतून सुटका होणे म्हणजे काय याचा अनुभव उत्तराखंडातील सिलक्यारा येथील बोगदा दुघर्टनेनंतर सर्वांना आला. संकट हरले प्रयत्न जिंकले, अशी अनुभूती सर्वांना आली आणि मानवी प्रयत्नांचे हे यश देशभर नव्हे अवघ्या विश्वात गाजले. देशभर पायाभूत कामे आणि त्यासाठी रस्ते, बोगदे, पूल यांची उभारणी सुरु असते. उत्तराखंडातील उत्तरकाशी जवळच्या सिलक्यारा येथे बारा नोव्हेंबरला एका बोगद्यात दरड कोसळली आणि त्यामध्ये 41 मजूर अडकले. बोगदा सुमारे शंभर मीटर ढिगाऱ्याने भरलेला अशावेळी आत काय झाले असेल, ढिगाऱ्याखाली या जिवांचे काय झाले असेल हे सांगणेही कठीण. अशावेळी आत मजूर आहेत आणि त्यांचा शोध व मदत केली पाहिजे या हेतूने ही बचाव मोहीम सुरु झाली. एक अविश्वसनीय लढाई सुरु झाली. माणसांचे प्रयत्न आणि मृत्यूचा आ वासलेला जबडा. अखेर माणूस जिंकला. माणसाची जिद्द जिंकली. प्रयत्नांना यश आले आणि सतरा दिवसांनी मृत्यूच्या दाढेत अडकलेले हे 41 मजूर सहीसलामत बाहेर आले. बाहेर आलेल्या सर्वांनी मोकळा श्वास घेतला आणि या अथक, अपूर्व आणि यशस्वी मोहिमेचा गौरव झाला. एक वेगळा इतिहास लिहिला गेला. दरड कोसळली तेव्हा बोगद्याचे तेंड बंद झाले. आतामध्ये 41 मजूर होते. त्यांना बाहेर येण्यास वाटच नव्हती. अवघा हलकल्लोळ माजला. रडारड सुरु झाली. नातेवाईक प्रार्थना, याचना करु लागले. साऱ्या यंत्रणा अलर्ट झाल्या. पण या मजुरांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मोठे आव्हान होते. राष्ट्रीय आपदा निवारण दलाला पाचारण करण्यात आले. आव्हान जटील आणि नाजूक होते. ढिगाऱ्यातून खाली अडकलेल्या 41 जणांचे प्राण वाचवणे हे ध्येये होते. राज्य आणि केंद्र सरकार आणि जगभराच्या यंत्रणा मदतीला तत्पर होत्या. आणि माणूस निसर्गाच्या या संकटावर मात करण्यासाठी जिद्दीने सरसावला होता. अनंत अडचणी, विविध मते, टिका-टिप्पणी, आरोप पण बचाव पथकांचा निर्धार पक्का होता. त्यांना हवी ती रसद पोहोचत होती आणि मंगळवारी रात्री यश हाताशी आले व माणसांचे प्रयत्न जिंकले. सतरा दिवसांची लढाई यश मिळवून आनंदली. अवघ्या देशभर नव्हे जगभर आनंदाची, समाधानाची लाट आली. पंतप्रधान मोदी या सर्व मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेऊन होते. सर्व मजूर सुखरुप बाहेर आले आणि त्यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला. सर्व टिमचे अभिनंदन केले. दरड कोसळणे, ढिगाऱ्याखाली माणसे अडकणे असे प्रकार नवीन नाहीत. भूस्खलन दुर्घटनाही पावसाळ्यात समोर येतात. त्यावर मात करण्याचे, बचाव व मदत कार्य करण्याचे प्रयत्न सर्वत्र होतात. उत्तराखंड आणि उत्तरकाशीमध्ये आजवर अनेक आपत्ती व निसर्ग प्रकोप पाहायला मिळाले आहेत. आपल्याकडेही भूस्खलन पिंवा डोंगर कोसळताना अशा घटना समोर आल्या होत्या. पण जिवीतहानी पूर्णपणे रोखता आली असे फारसे झाले नाही. साऱ्या यंत्रणा, मदत व बचावसाठी अग्रेसर असतात पण पाऊस, चिखल, आक्रोश, टिका, राजकारण, दुर्घटना पर्यटन यामुळे अडथळे येतात. निसर्ग प्रतिकूल झाला. पावसाने झोडपले, भूकंप, भूस्खलन अशी आपत्ती आली किंवा महापूर, आग याचा प्रकोप झाला तर कोणाचेच चालत नाही. अलीकडे अनेक यंत्रे, अवजारे यांचे शोध लागले आहेत. त्याचप्रमाणे संपर्क यंत्रणाही विकसित झाल्या आहेत पण ही यंत्रणा दुर्घटना ठिकाणापर्यंत पोहोचवणे आणि दुर्घटनेवर मात करणे यासाठी जबर इच्छाशक्ती लागते. या बोगदा दुर्घटनेत 12 नोव्हेंबरला रविवारी दरड कोसळली. समोर दिवाळी, देशभर उत्सवाचे वातावरण, सुट्टी आणि रजेचे दिवस असताना यंत्रणा हलली आणि घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन कामाला लागली. मजुरांच्या सुटकेसाठी अमेरिकेतून विशेष क्षमतेचे मशिन आणण्यात आले. या ऑगर ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने ढिगाऱ्याखालील मजुरांना धक्का न लागता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले पण हे मशीन बंद पडले. संकटे पाठोपाठ येतात याची अनुभूती आली. जीव वाचवणाऱ्याच्या मोहिमेत चढ-उतार जाणवू लागले. पण जिद्द हरलेली नव्हती. युद्ध प्रथम मनात हरते मग रणांगणावर असे म्हटले जाते पण मन हरले नसले तर विजय खेचून आणता येतो आणि तसेच झाले. मृत्यूच्या दाढेतून शंभर मीटर जमिनीखाली बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 जणांचे प्राण वाचवण्याची मोहीम फत्ते झाली. बचाव व मदत पथकांची शर्थ कामी आली. अनेकांच्या प्रार्थना फळास आल्या. नवा इतिहास लिहिला गेला आणि असेही होऊ शकते हे सर्वांना पाहता आले. अडीच फूट रुंदीच्या पाईपमधून या 41 जणांना बाहेर काढले तो क्षण आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह आणि केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांनी आनंदाने नाचतच त्यांचे केलेले स्वागत आणि या 41 जणांच्या कुटुंबाच्या डोळ्यात जमा झालेले आनंदाश्रू यांना तोड नाही. जेव्हा यंत्र चालेनासे झाले तेव्हा या टिमने मानवी श्रमातून ढिगारा उपसायला सुरुवात केली. आतमधील मजुरांना मनोधैर्य, अन्न, पाणी, श्वास गरजेचा होता. काळ घोंगावत होता. पण नळातून सोडलेल्या स्टेचरवरुन पहिला मजूर बाहेर आला. एका पाठोपाठ एक असे सर्व मजूर सुखरुप बाहेर आले. पुर्नजन्म म्हणजे काय यांचा त्यांनी अनुभव घेतला. आता तो सारा रोमांचकारी इतिहास आहे. त्यावर चित्रपट निघतील अनेक कादंबऱ्या, कथा लिहिल्या जातील आणि मोहीम फत्ते करणाऱ्यांचे पोवाडे गायले जातील. रॅट मायनिंग, रोबोटिक्स, एन्डोस्पोपिक कॅमेरा, ऑर्गर मशिन, रॅट होल्स यासर्व गोष्टींचा अधिक अभ्यास होईल. आपत्ती निवारण दलांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. घडलेली दुर्घटना त्यानंतर उचललेली पावले, केलेला खर्च सांगण्यावर उलटसुलट चर्चा होईल. पण आज जगभर मेसेज गेला आहे. ढिगाऱ्याखाली शंभर मीटर मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या 41 मजुरांना भारताने वाचवले. कठीण, अतिकठीण मोहीम फत्ते करुन दाखवली. देशाचा तिरंगा उंचावला. संकटांना, अडचणींना भारत पाठ दाखवत नाही आणि देशाचे सर्व नागरिक व पंतप्रधानांसह सारे या मोहिमेत अग्रेसर असतात. नरेंद्र मोदी केवळ याच दुर्घटनेत नव्हे तर रेल्वेची धडक असो वा नैसर्गिक प्रकोप ठाण मांडून बसतात. शक्य ते सर्व करुन दाखवतात. भारताची नवी ओळख निर्माण झाली आहे. तिचे स्वागत केले पाहिजे. अशीच जिद्द, प्रयत्न सर्व स्तरावर केले पाहिजेत. या यशस्वी मोहिमेचे आणि त्यामध्ये सहभागी सर्वांचे अभिनंदन.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article