गुन्हेगार फरार, देशात आणीबाणी, हजारो सैनिक तैनात
इक्वेडोरच्या तुरुंगातून सर्वात धोकादायक गुन्हेनार फरार :
► वृत्तसंस्था/ क्वीटो
दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरच्या तुरुंगातून देशातील सर्वात धोकादायक गुन्हेगार फरार झाल्याने 60 दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या गुन्हेगाराचे नाव एडोल्फो मासियास विलामर असून तो लॉस कोनेरोस टोळीचा म्होरक्या आहे. मागील काही काळात इक्वेडोरच्या तुरुंगात झालेल्या अनेक घातक दंगलींमागे याच टोळीचा हात राहिला आहे.
एडोल्फोला फीटो या नावाने देखील ओळखले जाते. त्याला इक्वेडोरच्या सर्वात सुरक्षित तुरुंगात ठेवण्यात आले होते. देशात अमली पदार्थांची तस्करी, हत्या आणि इतर गुन्ह्यांसाठी जबाबदार लोकांची वेळ आता संपत चालली आहे. आम्ही दहशतवाद्यांसोबत चर्चा करणार नाही. जोपर्यंत इक्वेडोरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे उद्गार इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोओ यांनी काढले आहेत.
6 तुरुंगांमध्ये सुरक्षारक्षक ओलीस
फिटोला शोधण्यासाठी हजारो सैनिक आणि पोलिसांना रस्त्यांवर उतरविण्यात आले आहे. फिटो गायब झाल्यावर इक्वेडोरच्या 6 तुरुंगांमध्ये सुरक्षारक्षकांनाच ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती सरकारचे प्रवक्ते रॉबर्टो इजुरीटा यांनी दिली आहे. चेहरा झाकलेले कैदी चाकू घेऊन सुरक्षारक्षकांना धमकावित असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. तुरुंगातील घटनेची माहिती मिळताच पोलीस अणि सैनिक तेथे दाखल झाले आहेत. त्यांनी गुन्हेगारांना तुरुंगाच्या कोर्टयार्डमध्ये एकत्रित केले. आणीबाणीच्या अंतर्गत देशभरात सभांवर बदी आणि रात्रीच्या वेळी संचारबंदीची तरतूद आहे.
फीटोला 34 वर्षांची शिक्षा
एडोल्फ मासियास हा लॉस कोरोनोस टोळीचा प्रमुख आहे. 2011 मध्ये अमली पदार्थांची तस्करी आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांप्रकरणी त्याला 34 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हीत. ऑगस्ट 2023 मध्ये त्याला अत्यंत उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात हलविण्यात आले होते. तसेच तेथे हजारो सैनिकांना तैनात करण्यात आले होते. फीटोवर इक्वेडोरमधील अध्यक्षीय पदाचे उमेदवार राहिलेले फर्नांडो विलावीसेंशियो यांच्या हत्येचाही आरोप आहे. फर्नांडो यांनी प्रचारादरम्यान भ्रष्टाचार, अमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. हत्येपूर्वी फीटोने फर्नांडो यांना अनेकदा धमकाविले होते. फीटो यापूर्वी 2013मध्ये देखील तुरुंगातून फरार झाला होता. तेव्हा 3 महिन्यांनी त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
तुरुंगात अनेकांचा मृत्यू
कोकेन तस्करीसाठी कुख्यात इक्वेडोरमध्ये मागील काही वर्षांपासून मॅक्सिकन आणि कोलंबियन कनेक्शन असलेल्या टोळ्यांदरम्यान वर्चस्वाची लढाई सुरू आहे. याचमुळे तेथे अनेकदा हिंसा होत असते. तसेच तेथील तुरुगांमध्ये देखील मोठे टोळीयुद्ध भडकत असते. या तुरुंगांवर फीटोसारख्या गुन्हेगारांचे नियंत्रणत आहे. 2021 पासून आतापर्यंत तुरुंगात सुमारे 460 कैदी मारले गेले आहेत. या कैद्यांचे मृतदेह अनेकदा कापून फेकले जातात.