अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा उघड
सातारा :
गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेत प्रकरणाचा छडा लावला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर एक अल्पवयीन शाळकरी मुलगी आपल्या नेहमीच्या मार्गाने घरी जात असताना जवळच असलेल्या चौकात एकाने तिला बहाणा करून एका इमारतीच्या पार्किंगमध्ये नेले आणि लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी घाबरल्याने ती बेशुद्ध पडली. घाबरून त्या इसमाने तिथून पळ काढला होता. शुद्धीवर आल्यावर त्या मुलीने आरडाओरडा केल्याने ही घटना समोर आली होती. याबाबत शाहूपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शाहूपुरी पोलीस या परिसरात बारकाईने तपास करत होती. परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. गोपनीय खबरी कामाला लागले. दरम्यान, या मुलीवर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
शाहूपुरी पोलिसांनी अत्यंत परिश्रम घेत या घटनेचा उकल करत आधीपासूनच संशयाच्या घेऱ्यात असलेल्या एका अल्पवयीन तरुणांकडे कसून तपास केला असता त्याने सदर प्रकरण आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
या प्रकरणात सहा दिवस उलटूनही संशयित फरारी असल्याने परिसरातील महिलांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेत सदर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करण्याची निवेदन देऊन विनंती केली होती.
शाहूपुरी पोलिसांनी प्रकरणाचे गंभीर्य लक्षात घेत या प्रकरणात चारही बाजूने तपास करून त्याच परिसरातील एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले. या अल्पवयीनने त्याबाबत आधी पोलिसांना गुंगारा देत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी अधिक कौशल्यपूर्णरित्या त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुह्याची कबुली दिली.
- हा तपास आमच्यासाठी महत्वपूर्ण होता
घडलेल्या घटनेचे गंभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हा गुन्हा स्वत:कडे घेऊन तपास करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरणची टीम दिवस रात्र तपास करत होती. एकंदरीत तपासाची सुई फिरून फिरून अटक संशयिताकडे येत होती. मात्र संशयिताची ओळख होणे आवश्यक असल्याने घटनेतील शाळकरी मुलगी रुग्णालयातुन बाहेर निघताच तिला महिला पोलिसांकडून विश्वासात घेत घटनेतील संशयिताचे वर्णन करण्यास सांगितले आणि त्यावरून त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आणि मुलीच्या वर्णनावरून तयार रेखाचित्र हुबेहूब जुळत असल्याने आम्ही त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने सदर गुह्याची कबुली दिली.
- सचिन म्हात्रे, पोलीस निरीक्षक शाहूपुरी
- मोबाईलमुळे आपली मुलं वाया जात आहेत का..?
सध्याची मुलं हे मोबाईलचे व्यसनी झाले असून आपली मुले मोबाईलवर काय पाहत आहेत याबद्दल पालकांना काहीही कल्पना नसते. मात्र मोबाईलमध्ये सहज उपलब्ध होणारे व्हिडीओ पाहून मुलांच्या मानसिकतेवर याचा काय परिणाम होतो. मुले एकलकोंडी होतात. आपल्या मनावरील ताबा सुटतो, भावनांना आवर घालणे अशक्य होते, आणि यातुनच पुढे त्याच्या हातून कळत नकळत गुन्हे घडतात आणि चांगल्या घरातील मुले कायद्याच्या कचाट्यात अडकतात.