खून करून अपघाताचा बनाव, डोक्यात चिनी मातीची बरणी मारुन पुतण्याकडून काकाचा खून
24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मयत हे घराच्या पायरीवरून चालताना पडले
तासगाव : तासगांव तालुक्यातील कवठेएकंद येथे नेहमी शिवीगाळ करीत असल्याचा राग आल्याने पुतण्याने चुलत्याच्या डोक्यात चिनी मातीची बरणी मारून त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे. खून करून अपघाताचा बनाव केला होता. याप्रकरणी संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथील पो. हे. कॉ. सागर टिंगरे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन दोन दिवसात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकास यश आले आहे.
मिरासो बाबासो तांबोळी (वय 62, रा. कवठेएकंद ता. तासगांव) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी तासगांव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विजय नामदेव गस्ते यांनी सुभाण उस्मानगणी तांबोळी (वय 23, रा. कवठेएकंद ता. तासगांव) यांच्या विरूद्ध फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे या पथकाने केली आहे.
याबाबत माहिती अशी की, 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मयत हे घराच्या पायरीवरून चालताना पडले. यावेळी त्यांच्या डोक्यास मार लागल्याचे त्यांचा भाऊ इस्मान बाबू तांबोळी यांनी कळविले. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते मयत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मिरासो तांबोळी यांचे मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांना संशय आला. यामुळे अधिकाऱ्यांसह पोलिसांनी कवठेएकंद येथील घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाची व मयत यांच्या घराची पाहणी केली असता, घटनास्थळावर मयताच्या रक्ताचे डाग दिसून आले नाहीत. नातेवाईकांना विचारले असता, आम्ही अत्यंविधीकरीता पै-पाहुणे येणार असल्याने रक्त पुसल्याचे सांगितले. शरीरावरील जखमा व घटनास्थळावरील परिस्थितीवरून मयत हे घराचे पायरीवरून पाय घसरून पडून मयत झाल्याबाबत दाट संशय पोलिसांना आला. त्यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, तासगांव यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी या जखमा पाय घसरून पडुन झालेल्या नाहीत असा अभिप्राय दिला.
खबऱ्यामार्फत मिळाली माहिती वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस तपास करण्याबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि स्टाफ यांचे एक पथक तयार करून सूचना दिल्या. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मयत मिरासो तांबोळी हे पायरीवरून पडल्याने मार लागून मयत झाले नसून त्यांचा पुतण्या सुभाण तांबोळी याने त्यांच्या डोक्यात काही तरी मारून त्यांचा खून केला असून अपघाताचा बनाव केला आहे.
नेहमी शिविगाळ करीत असल्याने खून
मिळालेल्या माहितीनुसार संशयित इसम सुभाण उस्मानगणी तांबोळी याची माहिती काढून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने काका मिरासो तांबोळी हे त्याला व त्याच्या आई-वडिलांना नेहमी शिवीगाळ करत होते. 24 रोजी वडिलांना शिवीगाळ करताना राग आल्याने हाताने मारहाण करून खाली पाडून रागाचे भरात जवळच असलेली चिनी मातीची बरणी त्यांच्या डोक्यात घालून त्यांचा खून केला होता. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काका मिरासो हे जिन्यावरून बरणी घेऊन येताना पाय घसरल्याने जिन्यावरून पडल्याने डोक्यास मार लागला असल्याचा बनाव तयार केल्याची कबुली दिली आहे.