Sangli Crime : प्रेमसंबंधासाठी सतत त्रास देत युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
सांगली जिल्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गंभीर प्रकरण उघडकीस
सांगली : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई (वय २४) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत दीर अभिषेक उत्तम देसाई (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) याच्याविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृत पूजा यांची आई छाया मुगटराव ननावरे (रा. खुटबाव, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा आणि राहुल अशोक देसाई यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. विवाहानंतर पूजा ही सासरी मार्डी येथे राहण्यास होती. २०२१ मध्ये तिचा चुलत दीर अभिषेक याने पूजा हिला हात पकडला होता. तिने आईला हा प्रकार सांगताच त्यांनी अभिषेकला जाब विचारला. तेव्हा त्याने 'मला पूजाशी लग्र करायचे होते' असे सांगितले. तेव्हा पूजाच्या आईने त्याला खडसावले होते.
त्यानंतर पूजाचे पती राहुल यांची सांगलीला बदली झाल्यामुळे ते विश्रामबाग येथे राहण्यास आले. तरीही अभिषेक हा वारंवार पूजाला फोन करून त्रास देत होता. मला तुझ्याशी लग्र करायचे होते. तू माझ्याशी फोनवर बोलली नाहीस तर तुझ्या पतीला सांगून बदनामी करेन अशी धमकी देत होता.
दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पूजाने पुन्हा एकदा आईला दीर अभिषेक हा कॉल करून त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजाच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुजाचा चुलत दीर अभिषेक देसाई याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.