क्रिकेट विश्वातील दिग्गजांची अश्विनला मानवंदना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रिकेट जगतातील दिग्गजांनी बुधवारी सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या कामगिरीचे कौतुक करून त्याला मानवंदना दिली. भारतीय संघासोबतच्या प्रदीर्घ कारकिर्दीदरम्यान अश्विन बदलणाऱ्या खेळाशी जुळवून घेण्याकरिता स्वत:ला बदलत राहिला. त्याच्या या गुणाने सचिन तेंडुलकरला देखील प्रभावित केलेले आहे.
‘परिपूर्ण कॅरम बॉलपासून ते धावांचे महत्त्वपूर्ण योगदान देण्यापर्यंत तू नेहमीच जिंकण्याचा मार्ग शोधून काढलास. तुझा प्रवास दाखवतो की, प्रयोग करण्यास आणि उक्रांत होण्यास कधीही न घाबरण्यात खरी महानता दडली आहे. तुझा वारसा सर्वांना प्रेरणा देत राहील’, असे तेंडुलकरने अश्विनला संबोधून ‘एक्स’वर लिहिलेल्या संदेशात नमूद केले आहे.
अश्विनचा दीर्घकाळचा सहकारी विराट कोहलीने त्याला भावनिक मानवंदना वाहताना त्याच्याबरोबरच्या 14 वर्षांच्या मैत्रीचे स्मरण केले, तर सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भावी पिढ्यांवर त्याचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले आहे. अजिंक्य रहाणेने त्याचा प्रत्येक चेंडू बळी मिळविणारा कसा वाटत होता त्याची आठवण करून दिली.
‘मी 14 वर्षे तुझ्यासोबत खेळलो आहे आणि जेव्हा तू आज मला निवृत्त होत असल्याचे सांगितले तेव्हा मी थोडा भावूक झालो आणि इतकी वर्षे आम्ही एकत्र खेळलो त्याच्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर आल्या’, असे कोहलीने ‘एक्स’वर पोस्ट केले आहे. अश्विनने निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी कोहली ड्रेसिंग रूममध्ये दीर्घ संभाषणानंतर या ऑफस्पिनरला मिठी मारताना दिसला. त्यावेळी अश्विन डोळ्यांत आलेले अश्रू पुसत होता. त्याच्यावरून तो निवृत्त होणार असल्याच्या अंदाजांना उधाण आले होते.
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अश्विनचे कौशल्य हे भारतीय क्रिकेटच्या यशाचा आधारस्तंभ राहिले असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारताचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्राrने अश्विनच्या कौशल्याचे आणि भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानाचे कौतुक केले आहे. भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज अनिल कुंबळेनेही अश्विनचे त्याच्या शानदार कारकिर्दीबद्दल कौतुक केले असून माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने अश्विनला ‘खरा मॅचविनर’ म्हटले आहे.