जय शहा यांच्या कार्यकाळात क्रिकेटची अधिक भरभराट होईल
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे आगामी अध्यक्ष म्हणून मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या झालेल्या बिनविरोध निवडीचे स्वागत करताना क्रिकेटमधील दिग्गज सुनील गावस्कर यांनी आयसीसीचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर खेळ आणखी भरभराटीला आला, तर आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले आहे. ग्रेग बार्कले यांच्यानंतर आयसीसीच्या सर्वोच्च पदावर आरुढ होणाऱ्या शाह यांच्या निवडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना गावसकर यांनी सांगितले की, ही खूप सुंदर बातमी आहे. सर्व भारतीय आयसीसी अध्यक्षांनी खेळाला पुढे नेले आहे आणि आयसीसीसाठी आणि इतर सदस्य देशांसाठी अधिक महसूल आणला आहे. जर राजकीय पक्षपातीपणा बाजूला ठेवला, तर जय शाह यांनी भारतीय क्रिकेटसाठी मोठी पावले उचलली आहेत हे कुणालाही मान्य होईल, असे ते म्हणाले.
2019 पासून बीसीसीआयचे सचिव म्हणून शाह यांनी बजावलेल्या कामगिरीची यादी सादर करताना गावस्कर म्हणाले की, महिला प्रीमियर लीग सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी भारतीय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची फी भारतीय पुऊष संघातील सदस्यांच्या बरोबरीने वाढवली. निवृत्त क्रिकेटपटूंचे पेन्शन वाढविले आणि कसोटी तसेच मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन दिले. त्याशिवाय देशांतर्गत स्पर्धांसाठी बक्षीस रक्कम सुरू केली. नवीन अत्याधुनिक नॅशनल क्रिकेट अकादमी देखील त्यांच्या कार्यकाळात तयार झाली. आमच्यासमोर हे सर्व असताना त्यांच्या आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर खेळ अधिक भरभराटीला आला, तर आश्चर्य वाटणार नाही, असे ते म्हणाले.