क्रिकेटवर भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे वर्चस्व
डॉ. अली बाकर यांनी व्यक्त केलेले मत : दक्षिण आफ्रिका पडली बाजूला
वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
क्रिकेट साऊथ आफ्रिकाचे माजी अध्यक्ष डॉ. अली बाकर यांना बीसीसीआयला खेळाच्या प्रसारणाच्या व्यापारीकरणाचा परिचय करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली असली, तरी संपूर्ण वर्चस्वाचा आनंद घेण्यासाठी फक्त तीन क्रिकेट मंडळांनी इतरांना बाजूला ढकलून देणे त्यांना पसंत नाही.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट मंडळे क्रिकेटचे वेळापत्रक ठरवितात हे गुपित राहिलेले नाही आणि वर्णभेदाचे सत्र संपल्यानंतर दक्षिण अफ्रिकी क्रिकेटला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या बाकर यांना त्याचे आश्चर्य मुळीच वाटत नाही. मी जेव्हा आयसीसीच्या विकास समितीचा अध्यक्ष होतो तेव्हा खेळाचा प्रसार करणे हा माझा उद्देश होता. ते आज घडत नाही. क्रिकेटमध्ये आज भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांचेच वर्चस्व आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दुर्लक्षित झालेले असून हे चांगले नाही, असे आता 81 वर्षांच्या असलेल्या बाकर यांनी म्हटले आहे.
आपल्याला खेळ वाढवायचा आहे. पण समस्या अशी आहे की, जागतिक क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेवर भारताचे वर्चस्व आहे आणि जागतिक क्रिकेटमधील 70 टक्के पैसा कोणत्याही दिशेहून आला, तरी तो भारतातूनच येतो. मला छोट्या राष्ट्रांचा विकास बघायचा आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. ‘आयसीसी’ क्रिकेटचा अमेरिकेत प्रसार करू पाहत असून त्याच्या अंतर्गत पुढील वर्षीच्या ‘टी-20 विश्वचषका’चे सहयजमानपद त्यांना प्रदान करण्यात आले आहे. तसेच 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
पण एक हुशार प्रशासक राहिलेले आणि दक्षिण आफ्रिकेचे वर्णभेदपूर्व काळातील माजी कसोटी कर्णधार असलेले बाकर याविषयी फार आशावादी नाहीत. मला वाटत नाही की क्रिकेट ज्या प्रकारे अपेक्षा केली जात आहे त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात तिथे वाढेल. आयसीसीच्या विकास समितीचे अध्यक्ष या नात्याने मी अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करण्यास उत्सुक होतो. परंतु ते अवघड आहे, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकी मार्केटचा एक छोटासा हिस्सा मिळविण्यासाठी देखील अब्जावधी डॉलर्स लागतात. खरे सांगायचे, तर मी एक-दोन प्रसंगांनंतर प्रयत्न थांबविले. कारण ते होणारे नव्हते. क्रिकेटचा विकास हा आशिया खंडात व्हायला हवा. तेथे प्रचंड क्षमता आहे. अमेरिकेत नव्हे, कारण ते प्रचंड महाग पडेल, याकडे बाकर यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य का नाही असे विचारले असता बाकर म्हणाले की, ते बेसबॉल, बास्केटबॉल आणि रग्बीवर जो खर्च करतात तो पैसा प्रचंड असतो. त्या बाजाराचा एक छोटासा भाग मिळवायचा झाल्यासही अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागतील आणि त्यासाठी वेळ लागेल. आशियामध्ये क्रिकेटचा प्रसार करणे त्याच्या तुलनेत खूप सोपे आहे. दक्षिण कोरिया, जपान या संभाव्य मोठ्या बाजारपेठा आहेत. जर ते देश बेसबॉल खेळत असतील, तर मग क्रिकेटकडे का वळणार नाहीत, असा प्रश्न त्यांनी केला.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटबद्दल बोलताना बाकर यांनी कबूल केले की, सध्याच्या राष्ट्रीय संघात जागतिक दर्जाच्या खेळाडूंची कमतरता आहे. आम्ही पूर्वीसारखे बलवान नाही. आमच्याकडे पूर्वी जबरदस्त खेळाडू होते, जसे की ए. बी. डिव्हिलियर्स, जॅक कॅलिस आणि शॉन पोलॉक. आमच्याकडे आता कागिसो रबाडा आहे, जो जागतिक दर्जाचा आहे. पण आता आमच्या अव्वल क्रिकेटपटूंची गुणवत्ता पूर्वीसारखी राहिलेली नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.