मार्सच्या पृष्ठभागावर दिसला ‘क्रिपी स्माइली’
अंतराळ संस्थेने सांगितले यामागील रहस्य
युरोपीय अंतराळ संस्थेचे इन्स्टाग्राम पेज हे अंतराळाविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी कुठल्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. सौरमंडळाविषयी अपडेट असो किंवा लाखो प्रकाशवर्षे दूर अंतरावरील कॉस्मिक बॉडीजविषयी माहिती या पेजवर मिळत असते.
आता मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर ‘घाबरविणाऱ्या स्माइली’चे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. ईएसएकडून शेअर करण्यात आलेली छायाचित्रे क्लोराइड मीठ भांडाराची असून ती लाल ग्रहाच्या इतिहासाविषयी अधिक माहिती देणारी आहेत.
‘व्हाय सो सीरियस? कधी नद्या, सरोवरे आणि कदाचित महासागरांचे जग राहिलेला मंगळ ग्रह आता आमच्या एक्सोमोर्स ट्रेस गॅस आर्बिटरकडून शोधण्यात आलेल्या क्लोराइड मीठ भांडाराच्या माध्यमातून स्वत:ची रहस्यांची उकल करत आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर स्माइलीप्रमाणे दिसणारे दृश्य हे क्लोराइड मीठ भांडार आहे’ असे ईएसएने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
मीठाचा हा भांडार, प्राचीन जलस्रोतांच अवशेष, अब्जावधी वर्षांपूर्वी वास्तव्य योग्य क्षेत्रांचे संकेत देतो. सुमारे एक हजार संभाव्य स्थळांचा शोध मंगळाचे हवामान आणि मागील जीवसृष्टीच्या शक्यतांविषयी नवी इनसाइट प्रदान करतो असेही ईएसएने नमूद केले आहे. या पोस्टमध्ये स्माइलीसोबत मंगळ ग्रहाची आणखी अनेक छायाचित्रे आहेत.
शेअर करण्यात आल्यावर व्हायरल पोस्टला सुमारे 9 हजार लाइक्स मिळाल्या आहेत. ईएसएचा एक्सोबायोलॉजी ऑन मार्स प्रोग्राम (एक्सोमार्स प्रोग्राम) दोन मिशन्ससोबत सादर करण्यात आला होता. पहिला ट्रेस गॅस ऑर्बिटर 2016 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. तर दुसरा रोजलिंड फ्रँकलिन रोव्हर घेऊन जाणार असून तो 2028 मध्ये प्रक्षेपित होणार आहे.