‘क्रेडिट कार्ड’ बनले अनेकांचे आधार
50 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेले 93 टक्के लोक व्रेडिट कार्डवर अवलंबून
नवी दिल्ली :
सध्या क्रेडिट कार्ड आजकाल प्रत्येकाच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याच्या मदतीने विविध प्रकारची खरेदी, तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि अगदी खाण्यापिण्याची ऑर्डर देखील सहज करता येते. देशात क्रेडिट कार्डवरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
अलीकडच्या एका अहवालात असे दिसून आले आहे की, 50,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले सुमारे 93 टक्के लोक क्रेडिट कार्डवर अवलंबून आहेत. 85 टक्के स्वयंरोजगार असलेले लोक देखील कार्ड वापरत आहेत. या अभ्यासात गेल्या 12 महिन्यांत 20,000 हून अधिक लोकांच्या खर्चाचे विश्लेषण केले गेले.
थिंक360.एआय (tप्ग्हक्360.aग्) च्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की ‘बाय नाऊ पे लेटर’ (बीएनपीएल) सेवा 18 टक्के स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि 15 टक्के पगारदार व्यक्ती वापरतात.
थिंक 360. एआयचे सीईओ अमित दास म्हणाले की आता क्रेडिट कार्ड आणि बीएनपीएल सारख्या सेवा पगारदारांपासून फ्रीलांसरपर्यंत सर्वांसाठी आवश्यक बनल्या आहेत. फिनटेक कंपन्या एक नवीन इकोसिस्टम तयार करत आहेत. थिंक टँकच्या अहवालात भारतातील डिजिटल क्रेडिट क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या (फिनटेक) वाढत्या प्रभावाचाही उल्लेख आहे. अभ्यासात म्हटले आहे की 2022-23 या आर्थिक वर्षात फिनटेक कंपन्यांनी 92,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक कर्जे दिली आहेत. हे प्रमाणानुसार सर्व नवीन कर्जांच्या 76 टक्के आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे काय ते जाणून घ्या
क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्ड (एटीएम कार्ड) सारखेच एक प्लास्टिक कार्ड आहे. आपण डेबिट कार्डद्वारे आपल्या बँक खात्यातून पैसे काढू शकतो. त्याच वेळी, क्रेडिट कार्डद्वारे आपण बँका किंवा एनबीएफसींकडून कर्ज घेऊ शकतो आणि खरेदी करू शकतो. दरमहा तुम्हाला क्रेडिट कार्डच्या खर्चाचे बिल येते, जे एका निश्चित तारखेला भरावे लागते. जर पेमेंट केले नाही तर उर्वरित रकमेवर व्याज द्यावे लागेल.