क्रिएटीव्ह गडहिंग्लजकडे रेणुका चषक
बेळगाव : फिनिक्स पब्लिक स्कूल व फिनिक्स स्पोर्टस कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वर्षांखालील रेणुका चषक निमंत्रितांच्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गडहिंग्लज संघाने फिनिक्स स्कूल संघाला पराभव करून रेणुका चषक पटकाविला. तर ताराराणी स्कूल खानापूर संघाने तिसरे तर सेंटजॉन काकती संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात क्रिएटीव्ह स्कूल गडहिंग्लज व फिनिक्स स्कूल होनगा यांच्यात झाला. या सामन्यात गडहिंग्लज संघाने फिनिक्स स्कूलवर 5-1 अशा गोल फरकाने मात करून विजय मिळविला. गडहिंग्लजतर्फे अमुल्यने हॅट्ट्रीकसह 4 गोल नोंदविले. तर फिनिक्सतर्फे जान्वी मचवाडकर हिने एक गोल केला.
सामन्यानंतर बक्षिस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सुधाकर चाळके, सविता वनसे, मुख्याध्यापिका सरफुनिसा सुभेदार, बाळू कांबळे, नामदेव सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या क्रिएटीव्ह गडहिंग्लज संघाला आकर्षक चांदीचा चषक तर उपविजेत्या फिनिक्स संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वाधिक गुण अमुल्या कळसण्णावर गडहिंग्लज, आघाडीपटू गौतमी सुतार फिनिक्स, उगवती खेळाडू नेहा ठोमरे ताराराणी खानापूर, उत्कृष्ट गोलरक्षक जीया पुजारी फिनिक्स तर मालिकावीर सौम्या कल्याणी गडहिंग्लज यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आल. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विठ्ठल दिवटी, सार्थक दिवटी, प्रतिक दिवटी गडहिंग्लज यांनी काम पाहिले.