For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सृष्टी व सजीवनिर्जीव ही बाप्पांची निर्मिती आहे

06:42 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सृष्टी व सजीवनिर्जीव ही बाप्पांची निर्मिती आहे
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

उत्पत्ती, स्थिती आणि लय हा ईश्वरी खेळ आहे आणि तो व्यवस्थित चालू रहावा म्हणून श्री गणेश ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रुपात कार्य करत असतात हे जाणणे हेच ब्रह्मज्ञान होय. यालाच अभेदबुद्धियोग म्हणतात. बाप्पा म्हणाले, मीच महाविष्णु, सदाशिव, महाशक्ति, सूर्य आहे. मीच एक भूतांचा स्वामी असून अग्नि, उदक, पृथ्वी, आकाश, वायु, ब्रह्मा, विष्णु, रुद्र, इंद्रादि लोकपाल, दहा दिशा, अष्टवसु, चवदा मनु, गाई, मुनी, पशु, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष, पक्षीगण, तसेच एकवीस स्वर्ग, नऊ नाग, सात वने, मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध, राक्षससमुदाय, हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले.

थोडक्यात सृष्टीतील सर्व सजीवनिर्जीव स्वत:पासून निर्माण झाल्याचे बाप्पा राजाला सांगत आहेत. याचाच अर्थ असा की, हे दिसणारं सर्व जग ही बाप्पांचीच रूपं आहेत. आपण सर्व बाप्पाचं रूप आहोत हे लक्षात घेतलं तर आपापसातील ईर्षा, स्पर्धा, हेवेदावे हे निरर्थक ठरतात पण आपण सर्व मायेच्या आवरणाखाली असल्याने आपण सर्व बाप्पांची रूपं आहोत हे सहजासहजी आपल्या पचनी पडत नाही. त्यामुळे आपल्यावर असलेला षड्रिपुंचा अंमल प्रभावी होतो आणि म्हणूनच गणेशगीतेचा अभ्यास आवश्यक ठरतो.

Advertisement

सर्व सृष्टीनिर्मिती व त्यातील सजीवनिर्जीव ही स्वत:ची निर्मिती असल्याचे सांगून पुढं बाप्पा म्हणतात,

अहं साक्षी जगच्चक्षुरलिप्त: सर्वकर्मभि: ।

अविकारो प्रमेयो हमव्यक्तो विश्वगो व्यय: ।। 28।।

अर्थ-मी सर्वांचा साक्षी आहे, सर्व जग मला दिसते. मी सर्व कर्मापासून अलिप्त आहे, निर्विकार, अप्रमेय-अव्यक्त-ज्याचे यथार्थ स्वरूप कोणाला कळत नाही असा, सर्वव्यापी व अव्यय-नाशरहित आहे.

विवरण- ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत याची पुष्टी बाप्पा या श्लोकात करतात. आपल्या शरीरातील आत्मा हा परब्रह्माचाच अंश आहे. परब्रह्म जगातल्या सर्व व्यवहारावर लक्ष ठेवून असते तर आत्मा शरीरातील व्यवहाराचा साक्षी असतो. बाप्पा म्हणतात, संपूर्ण जगाचा डोळा मीच आहे. मी असंख्य डोळ्यांनी जगातील सर्वांचे व्यवहार, व्यापार पहात असतो. साक्षीत्वाने जग चालवत असतो. कुणाचेही किंचितसेही कर्म माझ्या नजरेतून सुटत नाही. हे जग कसं चालतंय ते बाप्पा साक्षी म्हणून केवळ पहात असतात. माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्याच्या पूर्वकर्मानुसार त्याच्या वाट्याला आलेल्या असतात परंतु त्या प्रत्येक समयी तो बरोबर वागतोय की चुकीचं ह्याची नोंद मात्र बाप्पा घेत असतात. हे लक्षात घेऊन आपण प्रत्येक प्रसंगी वागताना नीती न्यायानुसार वागतोय की नाही ह्याची दक्षता घेणं आवश्यक आहे असंच बाप्पा येथे सुचवत आहेत. पुढं बाप्पा म्हणाले, जग जरी माझ्या सत्तेने चालत असले तरी कुणाच्याही कोणत्याही कर्माचा लेप मला लागत नाही कारण मी त्यांना जबाबदार नसतो. शस्त्रs मला तोडू शकत नाहीत, अग्नी मला जाळू शकत नाही, पाणी मला भिजवू शकत नाही, वारा मला सुकवू शकत नाही. इंद्रियांनी मला जाणता येत नाही, मनाने मी समजत नाही, सृष्टीच्या आधीही मी होतोच. मी अजन्मा असून मला तुमच्यासारख्या बाल, कौमार्य, प्रौढ, तारुण्य वा वृद्धावस्था नाहीत, विकार नाहीत असा मी सर्व विश्व व्यापून राहिलो आहे.

अहमेव परं ब्रह्मा व्ययानन्दात्मकं नृप ।

मोहयत्यखिलान्माया श्रेष्ठान्मम नरानमून् ।। 29 ।।

अर्थ-हे राजा, अव्यय व आनंदरूपी परब्रह्म मी आहे. माझी माया सर्व श्रेष्ठ जनांना देखील मोहित करते.

विवरण- अशाप्रकारे जग आणि जगदीश्वरांची रचना करून सर्व प्रकारचे खेळ मी करत असतो. मीच सर्वांना आज्ञा देत असल्याने माझ्याच आज्ञेने सर्व व्यवहार चाललेले असतात. मी परब्रह्म होय. नाना प्रकारची बुद्धी व मोहमयी सिद्धी असे माझ्या मायेचे स्वरूप आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.